चांगलं मानधन मिळूनही दोन मोठे हिंदी प्रोजेक्ट्स सोडले! चैत्राली गुप्ते म्हणाली- "तिथे पैसै आहेत पण..."
By देवेंद्र जाधव | Updated: February 28, 2025 12:39 IST2025-02-28T12:38:41+5:302025-02-28T12:39:25+5:30
मराठी मनोरंजन विश्वात लोकप्रिय असणारी अभिनेत्री चैत्राली गुप्तेने दोन मोठे हिंदी प्रोजेक्टस करायला का मनाई केली? जाणून घ्या (chaitrali gupte)

चांगलं मानधन मिळूनही दोन मोठे हिंदी प्रोजेक्ट्स सोडले! चैत्राली गुप्ते म्हणाली- "तिथे पैसै आहेत पण..."
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री हिंदी इंडस्ट्रीतही नाव कमावत आहेत. अशीच एक अभिनेत्री म्हणजे चैत्राली गुप्ते (chaitrali gupte). मराठी मनोरंजन विश्वात गेली २५ वर्ष चैत्राली गुप्ते सक्रीय आहे. याशिवाय मराठीसोबतच गेली १५ वर्ष चैत्राली हिंदी मालिकाविश्वही गाजवत आहे. चैत्रालीने नुकत्याच एका मुलाखतीत हिंदी इंडस्ट्रीबद्दल एक विधान केलंय. दोन बिग बजेट हिंदी प्रोजेक्टसने चैत्रालीने का नकार दिला, याविषयी तिने खुलासा केलाय.
म्हणून चैत्रालीने नाकारले हिंदी प्रोजेक्ट्स
तारांगण चॅनलला दिलेल्या मुलाखतीत चैत्राली म्हणाली की, "हिंदी इंडस्ट्रीत मानधन चांगलं मिळतं. पण कसंय, एका क्षणानंतर पैसा हा महत्वाचा नसतो. काही ठिकाणी पैसा आहे पण तो आदर मिळत नसेल, तर असे दोन प्रोजेक्ट्स मी सोडलेत. चांगल्या पैशाचे मी दोन प्रोजेक्ट्स सोडले. कारण तिथे जर फक्त मुख्य कलाकारांना आदर देत असाल आणि बाकी सर्व २४ तास उपलब्ध आहेत असं गृहीत धरलं जातं. त्यामुळे असे दोन प्रोजेक्टस सोडले. कारण मला जर माझ्या वेळेला तिथे महत्व नसेल, आदर मिळणार नसेल तर पैसे असूनही मी नाही करणार. त्यामुळे अशी भरपूर पैशांची कामं मी सोडलेली आहेत."
चैत्रालीचं वर्कफ्रंट
चैत्राली गुप्तेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, तिने 'स्वप्नांच्या पलीकडले', 'ऋणानुबंध', 'शुभं करोती' या मालिकांमध्ये अभिनय केलाय. चैत्रालीने पुढे हिंदी मालिकाविश्वात तिचा मोर्चा वळवला. 'ये रिश्ते है प्यार के', 'विद्रोही', 'इमली', 'पिया अलबेला' या हिंदी मालिकांमध्ये चैत्रालीने अभिनय केलाय. चैत्राली नुकतीच सुप्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्या 'बडा नाम करेंगे' या वेबसीरिजमध्ये झळकत आहे. ही वेबसीरिज सोनी लिव्हवर रिलीज झालीय.