माणसांच्या साचेबद्ध जगण्यावर भाष्य करणारं दीप्ती लेलेचं 'रविवार डायरीज'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 04:39 PM2022-08-22T16:39:39+5:302022-08-22T16:43:31+5:30
दीप्तीने 'माझिया माहेरा' या मालिकेमध्ये सुद्धा काम केलं आहे. मात्र तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती, 'आम्ही दोघं राजा राणी' या मालिकेमुळे.
दीप्ती लेलेने स्टार प्रवाह वरील 'लगोरी' या मालिकेतून अभिनय सृष्टीत पदार्पण केल होतं. त्यात तिनं 'ऋतुजा' ही भूमिका साकारली होती. त्यानंतर दीप्तीने 'माझिया माहेरा' या मालिकेमध्ये सुद्धा काम केलं आहे. मात्र तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती, 'आम्ही दोघं राजा राणी' या मालिकेमुळे यामध्ये दीप्तीने 'मधुरा लेले' हे पात्र साकारलं होतं. सध्या ती 'रविवार डायरीज' या नाटकामुळे चर्चेत आहे. माणसांनी साचेबद्ध जगणे सोडलं पाहिजे हेच 'रविवार डायरीज' सुचवते.
या नाटकाचं लेखन-दिग्दर्शन चैतन्य सरदेशपांडेने केलं आहे. चैतन्यने नाटकात 'साने हे पात्र साकारलं आहे. नाटक आणि त्यातील भूमिकेविषयी चैतन्य सांगतो, "साधारण पाच वर्षांपूर्वी रविवार डायरीज लिहिलं होतं. 'माकड', 'फोबिया', 'गुगली फाय' मध्ये व्यस्त असल्यामुळे 'रविवार डायरीज' कुठेतरी मागे पडत होतं. अखेर लॉक डाऊन नंतर आम्हाला रंगभूमीवर आणता आलं. 'रविवार डायरीज'हे माणसांचं म्हणणं मांडणारं नाटक आहे. नाटकातून माणसाची व्यथा समोर येईलच, शिवाय त्याने कसं जगलं पाहिजे याचं उत्तरही डायरीज' हे सापडेल. या नाटकात एकूण पाच पात्र आहे. चार पात्रं हीच हाडामासाची माणसं असून पाचवं पात्र 'शर्ट' आहे. जरी ते निर्जीव पात्र असलं तरी बाकीच्या चौघांनी त्याचं अस्तित्व अगदी प्रामाणिकपणे उभं केलं आहे. नाटकाचं संपूर्ण कथानक हे या 'शर्टा' भोवती फिरते. माझ्या मते हा नाटकासाठी किमयागार ठरणार आहे.''
दीप्ती लेलेने नाटकात मध्यमवर्गीय माणसाच्या पत्नीचं काम केलं आहे. आपल्या भूमिकेबद्दल दीप्ती सांगते, "नवऱ्याच्या इच्छा-आकांक्षाच्या मागे पाळताना त्याची बायको टिपिकल बायको होऊन जाते. ती तिचं जगणं विसरून गेलेली असते. स्त्री म्हणून तिचं अस्तित्त्वच संपून जातं. आपलं अस्तित्त्व शोधण्यासाठी तिची धडपड चालू असते. ते शोधण्यासाठी तिला 'शर्ट'ची मदत होते. 'शर्ट' तिला कशी मदत करतो, त्यातून ती कशी बाहेर येते, तिच्या वाट्याला आलेल्या आव्हानांवर ती कशी मात करते, ती तिचा स्टँड घेऊन कशी उभी राहाते, पण तिला तिचं अस्तित्त्व सापडतं का, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नाटक बघितल्यावर सापडेल." चैतन्य सरदेशपांडे आणि दीप्ती लेले यतिरिक्त सिद्धार्थ प्रतिभावंत, पूजा कातुर्डे यांंच्या प्रमुख भूमिका आहेत