पुन्हा एकदा वहिनीसाहेबांचा ठसका; धनश्री काडगांवकर झळकणार 'या' मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 13:46 IST2022-07-12T13:44:35+5:302022-07-12T13:46:00+5:30
Dhanashri Kadgaonkar: काही महिन्यांपूर्वी धनश्रीने एका चिमुकल्या बाळाला जन्म दिला. या बाळाच्या संगोपनासाठी तिने कलाविश्वातून तात्पुरता ब्रेक घेतला होता.

पुन्हा एकदा वहिनीसाहेबांचा ठसका; धनश्री काडगांवकर झळकणार 'या' मालिकेत
छोट्या पडद्यावरील वहिनीसाहेबांना कोणी ओळखत नाही असं म्हणणारा क्वचितच एखादा व्यक्ती सापडेल. तुझ्यात जीव रंगला या मालिकेत दमदार अभिनय करत धनश्रीने कलाविश्वात तिची हक्काची जागा मिळवली. या मालिकेतील तिची वहिनीसाहेब ही भूमिका प्रचंड गाजली. मध्यंतरी धनश्रीने कलाविश्वातून तात्पुरता ब्रेक घेतला होता. मात्र, आता ती पुन्हा एकदा सक्रीय झाली असून लवकरच एका नव्याकोऱ्या मालिकेत झळकणार आहे.
काही महिन्यांपूर्वी धनश्रीने एका चिमुकल्या बाळाला जन्म दिला. या बाळाच्या संगोपनासाठी तिने कलाविश्वातून तात्पुरता ब्रेक घेतला होता. मात्र, पुन्हा एकदा नव्या दमाने ती प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. धनश्री लवकरच झी मराठीवरील एका नव्या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.
झी मराठीवर लवकरच 'तू चाल पुढं' ही नवी मालिका सुरु होत आहे. या मालिकेचा एक प्रोमो नुकताच समोर आला असून यात धनश्रीची झलक पाहायला मिळाली. या मालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा धनश्रीचा ठसका पाहायला मिळणार असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या प्रोमोमुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. धनश्रीच्या भूमिकेचं नाव काय? या मालिकेचं कथानक काय हे जाणून घेण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.