देशपांडे अन् तेंडुलकरचं जुळलं! गौतमी-स्वानंदची लगीनघाई, चाहत्यांची शंका ठरली खरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 14:17 IST2023-12-23T14:17:01+5:302023-12-23T14:17:48+5:30
गौतमीने सोशल मीडियावर दोघांचा फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे.

देशपांडे अन् तेंडुलकरचं जुळलं! गौतमी-स्वानंदची लगीनघाई, चाहत्यांची शंका ठरली खरी
मराठी मनोरंजनसृष्टीतून आणखी एक लग्नाची बातमी आली आहे. सध्या मराठी कलाकारामध्ये लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. कालच मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटेचं लग्न झालं. तर सुरुची अडारकर आणि पियुष रानडेने लग्न करत चाहत्यांना धक्का दिला. आता 'माझा होशील ना' फेम अभिनेत्री गौतमी देशपांडेही (Gautami Deshpande) लग्नबंधनात अडकत आहे. 'भाडीपा' फेम स्वानंद तेंडुलकरसोबत (Swanand Tendulkar) ती साता जन्माच्या गाठी बांधणार आहे. गौतमीने सोशल मीडियावर दोघांचा फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे.
गौतमी आणि स्वानंदचं ठरतंय ही शंका याआधीही चाहत्यांना होतीच. कारण त्यांचे मध्यंतरी एका लग्नातील फोटो व्हायरल झाले होते. यामध्ये गौतमीची बहीण मृण्मयी तिच्या नवऱ्यासोबत तर गौतमी स्वानंदसोबत दिसली. तर मृण्मयी काल परवाच्या पोस्टमध्ये सतत लग्नाच्या गडबडीची हिंट देत होती. आता अखेर ही शंका खरी ठरली आहे. गौतमीने स्वानंदसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा मेहंदी सोहळ्याचा फोटो आहे.यामध्ये गौतमीने गुलाही रंगाचा लेहेंगा घातला आहे तर स्वानंदनेही गुलाबी रंगाचं जॅकेट आणि पांढरा कुर्ता घातला आहे.दोघंही खूप गोड दिसत आहेत. त्यांचा हा रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 'सिक्रेट सांता लवकर आला' असं कॅप्शन तिने दिलं आहे. तसंच swaG असं हॅशटॅग त्यांनी ठरवलं आहे.
स्वानंद तेंडुलकर मराठीतील पहिलं डिजीटल चॅनल 'भाडिपा'चा बिझनेस हेड आहे. स्वानंद आणि गौतमीचं नक्की कसं जुळलं याची चाहत्यांना उत्सुकता आहे. मात्र या जोडीवर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. २५ डिसेंबरला दोघंही लग्नबंधनात अडकणार आहेत. याशिवाय स्वानंदी टिकेकर, मानसी घाटे या मराठी अभिनेत्रीही त्याच सातफेरे घेणार आहेत.