Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा ‘अॅक्टिव्ह’, फेसबुक सुरू होताच केली पहिली पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 10:49 AM2022-08-29T10:49:00+5:302022-08-29T10:52:16+5:30
Ketaki Chitale : आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी अटक झाल्यानंतर केतकी 41 दिवस तुरूंगात होती. सध्या ती जामीनावर आहे. पण आता पुन्हा एकदा चर्चा आहे ती केतकीच्या नव्या फेसबुक पोस्टची....
मराठी अभिनेत्री केतकी चितळे ( Ketaki Chitale) तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. काही दिवसांआधीच केतकी चितळेचा एक एपिसोड चांगलाच गाजला होता. होय, एका वादग्रस्त फेसबुक पोस्टमुळे केतकीला तुरुंगाची हवा खावी लागली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणं केतकी चितळेला महागात पडलं होतं. तिच्याविरोधात राज्यभरात 22 एफआयआर दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी अटक झाल्यानंतर केतकी 41 दिवस तुरूंगात होती. सध्या ती जामीनावर आहे. पण आता पुन्हा एकदा चर्चा आहे ती केतकीच्या नव्या फेसबुक पोस्टची.
होय, जामीनावर झालेल्या सुटकेनंतर आता केतकीला पुन्हा एकदा तिच्या फेसबुक अकाऊंटचा अॅक्सेस मिळाला आहे. म्हणजेच काय तर केतकीचं फेसबुक अकाऊंट पुन्हा अॅक्टिव्ह झालं आहे आणि एफबी अकाऊंट सुरू होताच आनंदाच्या भरात केतकीन पोस्ट केली आहे.
‘आणि अखेर मला माझ्या फेसबुकचा अॅक्सेस परत मिळाला आहे; निदात तात्पुरता तरी...LOL’, अशी पोस्ट केतकीने शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतेय. केतकीने 13 मे 2022 रोजी शरद पवारांबद्दल पोस्ट केली होती. त्यानंतर आज 29 ऑगस्टला तिने पहिली पोस्ट टाकली आहे.
केतकी चितळे हिने जामीन मिळाल्यानंतर पहिल्यांदाच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती.‘एखादी पोस्ट कॉपी पेस्ट करून फेसबुकवर शेअर केल्यानंतर इतका मोठा गुन्हा होतो का की तुम्ही थेट तुरुंगात टाकता, 41 दिवस तुम्ही त्या व्यक्तीपासून काढून घेता? मी काही चुकीचं केलं नाही, हे मला माहित आहे. त्यामुळे मी या गोष्टीचा सामना करू शकले,’ असं ती म्हणाली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही महिलांकडून आणि जमावाकडून मारहाण झाल्याचा आरोपही केतकीने या मुलाखतीत केला होता. ‘माझ्या कानाखाली मारण्यात आलं, डोक्यात कुणीतरी जोरात टपली मारली आणि राइट ब्रेस्टवर पंच मारला. मी साडी नेसली होते. कुणीतरी धक्का दिला, पायात पाय घातल्यामुळे मी पोलिसांच्या गाडीत पडले. साडी देखील खेचण्यात आली. माझा पदर पडला होता, साडी वर गेली होती, माझा विनयभंग झाला.... इतके होऊनही अंगावर केमिकल रंग आणि अंडीदेखील फेकण्यात आली,’ असा आरोप तिने केला होता.