'लाखात एक आमचा दादा' मालिका का सोडली? अभिनेत्री दिशा परदेशीने सांगितलं खरं कारण, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 14:22 IST2025-02-18T14:20:48+5:302025-02-18T14:22:41+5:30
छोट्या पडद्यावरील 'लाखात एक आमचा दादा' ही मालिका सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या मालिकांपैकी एक आहे.

'लाखात एक आमचा दादा' मालिका का सोडली? अभिनेत्री दिशा परदेशीने सांगितलं खरं कारण, म्हणाली...
Disha Pardeshi : छोट्या पडद्यावरील 'लाखात एक आमचा दादा' ही मालिका सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या मालिकांपैकी एक आहे. ही मालिका गेल्यावर्षी ८ जुलै २०२४ ला सुरू झाली. अगदी अल्पावधीत मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली. दरम्यान, या मालिकेत 'लागिरं झालं जी' फेम अभिनेता नितीश चव्हाण सूर्या दादाच्या भूमिकेत पाहायला मिळतोय तर अभिनेत्री दिशा परदेशीने तुळजाचं पात्र साकारलं आहे. ही मालिका सुरु झाल्यापासून मालिकेसह त्यातील पात्रांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं. परंतु अलिकडेच मालिकेत तुळजाची भूमिका साकारणाऱ्या दिशा परदेशी हिने मालिका सोडल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यामुळे चाहते नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. आता यावर अभिनेत्रीने स्पष्टीकरण दिलं आहे. दिशा परदेशी मालिकेला निरोप देत आहे. दिशाऐवजी आता मालिकेत नवीन तुळजा पाहायला मिळणार आहे.
नुकतीच दिशा परदेशीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मालिका सोडण्याचं कारणही सांगितलं आहे. दिशाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने लिहिलंय, "मायबाप रसिकहो! खूप प्रेम दिलंत तुम्ही…, 'लाखात एक आमचा दादा' ही माझ्यासाठी फक्त एक मालिका नाहीतर महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात हसत खेळत बागडण्याची संधीच जणू…, आणि माझं काय स्वागत केलंय तुम्ही…, स्वत:च्या मुलीसारखं प्रेम केलंत. सुनेसारखे लाड केलेत."
पुढे अभिनेत्रीने लिहिलंय, "पण, आता झालंय असं की, एका तब्येतीच्या सुरू असलेल्या अडचणीमुळे मला ही मालिका सोडावी लागत आहे. पण तरी एका नव्या भूमिकेत तुमचं मनोरंजन करण्यास पुन्हा सज्ज होईन अशी खात्री आहे. माझ्यासाठी प्रार्थना नक्की करा." अशी पोस्ट अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
तुळजाच्या भूमिकेत दिसणार 'ही' अभिनेत्री
अभिनेत्री दिशा परदेशीने 'लाखात एक आमचा दादा' मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर तिच्या जागी 'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकरची मालिकेत एन्ट्री होणार आहे. ही अभिनेत्री आता तुळजाच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर आता नवी तुळजा बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.