'नावगाव माहीत नसतानाही तुझे..'; फुलाने मोहरुन गेलेल्या मधुराणीचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 03:08 PM2022-05-26T15:08:09+5:302022-05-26T15:08:33+5:30
Madhurani gokhale prabhulkar: या पोस्टमध्ये तिने सेटवर तिला एका व्यक्तीने अनंताचं फूल दिल्याचं दिसून येत आहे. हे फूल पाहिल्यानंतर अरुंधतीला लगेचच द. भा. धामणस्कर यांच्या कवितेच्या ओळी सुचल्या आणि त्या तिने म्हणूनही दाखवल्या.
आई कुठे काय करते या मालिकेने आणि त्यातील कलाकारांनी लोकप्रियतेची एक वेगळीच उंची गाठली आहे. त्यामुळे या मालिकेविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. यात अनेकदा मालिकेतील कलाकार कधी सेटवरील तर कधी त्यांच्या वैयक्तिक जीवनातील अपडेटही नेटकऱ्यांसोबत शेअर करत असतात. यात अरुंधती म्हणजेच मधुराणी गोखले-प्रभुलकर तर सातत्याने चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. त्यामुळेच तिने एक पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मधुराणी गोखले-प्रभुलकर हिने अलिकडेच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने सेटवर तिला एका व्यक्तीने अनंताचं फूल दिल्याचं दिसून येत आहे. हे फूल पाहिल्यानंतर अरुंधतीला लगेचच द. भा. धामणस्कर यांच्या कवितेच्या ओळी सुचल्या आणि त्या तिने म्हणूनही दाखवल्या.
"तुझ्या केसात अनंताचे फूल आहे म्हणजे तुझ्याही अंगणात अनंताचे झाड आहे, ह्या जाणिवेने मी मोहरुन जातो. नावगाव माहीत नसतानाही तुझे, आपल्यात एक तरल संबंध रुजून आलेला मी पाहतो…," या द. भा. धामणस्कर यांच्या कवितेच्या ओळी मधुराणीने म्हटल्या.
दरम्यान, "आमच्या सेटवर अनंताचं झाड आहे... काल रियासतने ( सेटवरर=चा माझा काळजीवाहू ) मला हे फूल आणून दिलं.... माझा जीव आंनदला. कारण फुलं म्हणजे माझा अगदी जीव.... आणि तितक्याच नाजूक अशा फुलांवरच्या कविताही... ज्येष्ठ कवी द. भा धामणस्कर ह्यांची अशीच एक तरल कविता खास तुमच्यासाठी (headphones recommended)", असं कॅप्शन देत तिने ही कविता सादर केली. सध्या सोशल मीडियावर तिचा हा साधा पण तितकाच सुंदर व्हिडीओ व्हायरल होत आहे.