"मालिकेआधी कामच नव्हतं, पदरात मूल..."; मधुराणी प्रभूलकरने सांगितला 'तो' कठीण काळ
By ऋचा वझे | Updated: February 23, 2025 14:48 IST2025-02-23T14:47:37+5:302025-02-23T14:48:11+5:30
'कवितेचं पान', 'रंगपंढरी' सारखे कार्यक्रम करणाऱ्या मधुराणीची त्या काळी नेमकी काय घुसमट व्हायची?

"मालिकेआधी कामच नव्हतं, पदरात मूल..."; मधुराणी प्रभूलकरने सांगितला 'तो' कठीण काळ
'आई कुठे काय करते' मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar). तिची अरुंधती ही भूमिका प्रचंड गाजली. सुमारे पाच वर्ष ही मालिका चालली. दोन महिन्यांपूर्वीच मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र मधुराणी ही या मालिकेच्या आधीही सर्वांना माहित होती. सिनेमांमध्ये तिने भूमिका केल्या होत्या. शिवाय 'कवितेचं पान','रंगपंढरी' हे युट्यूब कार्यक्रमही तिने केले होते. जेव्हा पॉडकास्ट हा शब्दही नव्हता तेव्हा तिने युट्यूबवर या मुलाखती घेतल्या होत्या. पण त्या काळात मधुराणीला मेनस्ट्रीम मालिका, सिनेमांमध्ये फारसं काम का मिळालं नाही यावर तिने नुकतंच उत्तर दिलं आहे.
'मित्रम्हणे' युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मधुराणी त्या काळाबद्दल म्हणाली, "तो खूप कठीण काळ होता. सहन करता येणार नाही एवढी गुदमरत होते. चांगलं काम करायचं होतं. पण जिथे तसं काम होतं तिथपर्यंत मी पोहोचू शकत नव्हते. माझी निवड व्हायची नाही. नंतर लेकीसाठी मी पुण्यात येऊन स्थायिक झाले. तुम्हाला काम करायचं असेल तर मुंबईतच असावं लागतं हे सत्य आहे. मग वाटायला लागलं की आता आपण काहीतरी केलं पाहिजे. इतकं सगळं आपल्यात भरलं आहे ते दाखवायचं होतं. त्यामुळे खूप घुसमट होती ती. त्रासदायक घुसमट होती."
तू आधी रंगपंढरी, कवितेचं पान कार्यक्रम करायची. तरी तुला मालिका, सिनेमांमध्ये काम ता मिळत नव्हतं. यावर ती म्हणाली, "तुम्ही दिसत राहत नाही म्हणून तुम्हाला काम मिळत नाही. लोकांची तुम्ही दिसत राहण्याची खूप अपेक्षा असते. त्याही काळात मी विचार केला होता की मला मुलीला सांभाळत नाटकात काम करायला जमेल. आज मला दर आठवड्याला एक फोन नाटकासाठी येतो. पण त्यावेळी मी प्रत्येकाला नाटकासाठी फोन करायचे तेव्हा मला उत्तर यायचं की मालिकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या लोकांनाच आम्ही नाटकात घेतो. त्यांचीही काही चूक नाही कारण हा व्यवसाय आहे. मी आज निर्माती असते तर मीही म्हणेन की माझे पैसे रिकव्हर व्हायला पाहिजे. नवीन माणसाला कसं घेऊ? मी तेव्हा प्रसिद्ध नव्हते म्हणून मला काम मिळत नव्हतं."