अशोक सराफ यांच्यासोबत स्क्रीन शेअर केल्यानंतर मराठी अभिनेत्रीच्या आनंदाला उधाण, पोस्ट शेअर करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 16:49 IST2025-03-25T16:44:16+5:302025-03-25T16:49:40+5:30
कलर्स मराठी वाहिनीवरील 'पिंगा गं पोरी पिंगा' ही मालिका चांगलीच चर्चेत आहे.

अशोक सराफ यांच्यासोबत स्क्रीन शेअर केल्यानंतर मराठी अभिनेत्रीच्या आनंदाला उधाण, पोस्ट शेअर करत म्हणाली...
Vidisha Mhaskar Post: कलर्स मराठी वाहिनीवरील 'पिंगा गं पोरी पिंगा' ही मालिका चांगलीच चर्चेत आहे. याच मालिकेच्या माध्यमातून पाच भिन्न स्वभावाच्या मैत्रीणींची भन्नाट गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. ऐश्वर्या शेटे, विदिशा म्हसकर, शाश्वती पिंपळीकर, प्राजक्ता परब आणि आकांक्षा गाडे या अभिनेत्री मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. दरम्यान, मालिकेतील पिंगा गर्ल्सची मैत्री प्रेक्षकांना भावली आहे. कलर्स मराठी वाहिनीवर ‘अशोक मा.मा.’ आणि ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या दोन मालिकांचा महासंगम पाहायला मिळत आहे. त्यामुळे पिंगा गर्ल्स आणि अशोक मामा यांची अविस्मरणीय भेट घडून आली आहे. याचनिमित्ताने अभिनेत्री विदिशा म्हसकरने सोशल मीडियावर सुंदर अशी पोस्ट शेअर केली आहे.
आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी, 'पिंगा गं पोरी पिंगा' या मालिकेतील तेजा म्हणजेच विदिशा म्हसकर इन्स्टाग्रामवर अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. शिवाय सेटवरील काही खास फोटो देखील पोस्ट केले आहेत. विदिशाच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. "पिंगा गं पोरी पिंगा आणि अशोक मा. मा महाएपिसोड, तुम्ही पाहायला विसरु नका. अशोक मामांसोबत काम करण्याची संधी मिळाली. हे खूप छान आहे. त्यासाठी कलर्स मराठीचे मनापासून आभार...",अशी पोस्ट अभिनेत्रीने लिहिली आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे झळकत आहे. विदिशाने शेअर केलेल्या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
विदिशा म्हसकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तिने साकारलेल्या खलनायिकी भूमिका विशेष गाजल्या. 'रंग माझा वेगळा', 'भाग्य दिले तू मला' यांसारख्या लोकप्रिय असलेल्या मालिकांमध्ये ती झळकली आहे.