प्राजक्ता माळीची खोटी जाहिरात! अभिनेत्री भडकली, म्हणाली- "कलाकारांचे फोटो टाकून..."
By कोमल खांबे | Updated: January 31, 2025 13:09 IST2025-01-31T13:09:10+5:302025-01-31T13:09:52+5:30
साताऱ्यातील कराडमधील एका कार्यक्रमाला प्राजक्ता हजर राहणार असल्याची जाहिरात आयोजकांकडून करण्यात आली आहे. पण, या कार्यक्रमाचं तिला निमंत्रण आलेलं नाही. प्राजक्ताने या जाहिराताचा फोटो शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

प्राजक्ता माळीची खोटी जाहिरात! अभिनेत्री भडकली, म्हणाली- "कलाकारांचे फोटो टाकून..."
प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. जुळून येती रेशीमगाठी मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या प्राजक्ताचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. प्राजक्ता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील माहितीही ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते. अनेक कार्यक्रमांनाही प्राजक्ता हजेरी लावताना दिसते. अशाच एका कार्यक्रमाला प्राजक्ता हजर राहणार असल्याची खोटी जाहिरात करण्यात आली आहे.
साताऱ्यातील कराडमधील एका कार्यक्रमाला प्राजक्ता हजर राहणार असल्याची जाहिरात आयोजकांकडून करण्यात आली आहे. पण, या कार्यक्रमाचं तिला निमंत्रण आलेलं नाही. प्राजक्ताने या जाहिराताचा फोटो शेअर करत संताप व्यक्त केला आहे. या कार्यक्रमाच्या जाहिरातीत प्राजक्तासह अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी आणि हृता दुर्गुळे यांचे फोटोही आहेत. तर सचिन तेंडुलकर आणि नागराज मंजुळे यांचे फोटोही लावण्यात आले आहेत. "वरील प्रमुख कलाकारांता डान्स आणि गाण्याचा लाइव्ह परफॉर्मन्स" असं यामध्ये म्हटलं गेलं आहे.
प्राजक्ताने जाहिराताचा हा फोटो शेअर करत ही फेक न्यूज असल्याचं म्हटलं आहे. "या कार्यक्रमाला मी उपस्थित राहणार नाहीये. कार्यक्रमासंबंधी मला किंवा माझ्या टीमला कोणताही संपर्क साधला गेला नाही. ही फेक न्यूज आहे. संबंधितांनी नोंद घ्यावी. अशा प्रकारे कलाकारांचे फोटो टाकून प्रेक्षकांना फसवू नये ही विनंती", असं प्राजक्ताने म्हटलं आहे.