"दुपारीही १ ते ४ झोपणाऱ्या आणि कधीच...", प्राजक्ता माळीची 'मुंबई-पुणे-मुंबई' कविता ऐकली का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 10:57 IST2024-12-17T10:57:08+5:302024-12-17T10:57:31+5:30

"मुंबईचं ट्राफिक आणि पुणेरी पाट्या...", प्राजक्ताने सादर केली 'मुंबई-पुणे-मुंबई' कविता

marathi actress prajakta mali mumbai pune mumbai poem shared video | "दुपारीही १ ते ४ झोपणाऱ्या आणि कधीच...", प्राजक्ता माळीची 'मुंबई-पुणे-मुंबई' कविता ऐकली का?

"दुपारीही १ ते ४ झोपणाऱ्या आणि कधीच...", प्राजक्ता माळीची 'मुंबई-पुणे-मुंबई' कविता ऐकली का?

प्राजक्ता माळी हा मराठी कलाविश्वातील लाडका चेहरा आहे. जुळून येती रेशीमगाठी मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या प्राजक्ताने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्री असण्याबरोबरच प्राजक्ता एक उत्तम कवयित्री आहे. प्राजक्तप्रभा या तिच्या पुस्तकालाही चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. प्राजक्ताला 'महाराष्ट्र साहित्य परिषद'कडून ‘सुनीताबाई स्मृती साहित्य पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आलं. 

या पुरस्कार सोहळ्यात प्राजक्ताने तिची एक कविता सादर केली. प्राजक्ताच्या या कवितेचं नाव 'मुंबई-पुणे-मुंबई' असं असून या कविता वाचनाचे व्हिडिओ तिने शेअर केले आहेत. 


प्राजक्ता माळीची 'मुंबई-पुणे-मुंबई' कविता 

पुणे-मुंबई-पुणे नाही
आता 'मुंबई-पुणे-मुंबई' असा प्रवास करतो आम्ही...
जरी वाढलो पुण्यात, तरी कामानिमित्त मुंबईला राहतो
हे अभिमानानं सांगतो आम्ही...

पुणं कठोर, कर्तव्यदक्ष...
चुकल्यास कान पिळणाऱ्या बापासारखं...
तर मुंबई...सर्वांना मायेनं सांभाळून घेणारी आई वाटते आम्हांस
सतत धावणारी, उत्साहानं भारलेली मुंबई आवडतेच...
आणि निवांत, मोकळढाकळं पुणंही खास...

चालत असतानाही, थांबून पत्ता सांगणाऱ्या 
'Helpfull' मुंबईकरांचं कौतुक...
आणि spoon feeding न करता मेंदूचा उपयोग करायला भाग पाडणाऱ्या पुणेकरांचंही रास्त...

कामासमोर तहानभूक विसरणाऱ्या मानसिकतेचाही आदर
आणि ज्या पोटासाठी सगळी उठाठेव चाललीय
तिकडे कधीच दुर्लक्ष न करणाऱ्यांचंही बरोबर...
कधीच न झोपणाऱ्या आणि दुपारीही १-४ झोपणाऱ्या
अशा दोन्ही शहरात व्यवस्थित Adjust होतो आम्ही...

मुंबईचं ट्राफिक आणि पुणेरी पाट्या
अशा दोन्हीकडच्या कोपरखळ्या गोड हसत पचवतो आम्ही...
मुंबईचा वडापाव आणि पुण्याची मिसळ
Diet बाजूला ठेवून तितक्याच आवडीनं खातो आम्ही

अहो, एवढंच नाही...तर ह्या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या
Expresswayच्याही प्रेमात आहोत आम्ही...

एक शहर Extra self respect शिकवतं..
दुसरं Extra flexibility
एकीकडे डोंगरमाथा दुसरीकडे समुद्र खाडी
खरं तर नशीबवान आहोत, अशा दोन्ही शहरांच्या सानिध्यात वाढतोय..
सांस्कृतिक-आर्थिक अशा सगळ्या बाजूंनी प्रगल्भ होतोय...


प्राजक्ताची नवी कविता चाहत्यांना आवडली आहे. तिच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. तर काही सेलिब्रिटींनीही प्राजक्ताच्या या कवितेला दाद दिली आहे. 

Web Title: marathi actress prajakta mali mumbai pune mumbai poem shared video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.