रस्त्यावरील आजोबांकडून मराठमोळ्या अभिनेत्रीने खरेदी केली कोथिंबीर, म्हणते- बेबींच्या देठापासून ते ओरडत होते...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 12:09 PM2024-01-23T12:09:30+5:302024-01-23T12:10:13+5:30

काही ठिकाणी भाव करायचा नसतो! मराठी अभिनेत्रीच्या 'त्या' कृतीचं नेटकऱ्यांकडून कौतुक

marathi actress radhika deshpande buys coriander from old man on road shared video | रस्त्यावरील आजोबांकडून मराठमोळ्या अभिनेत्रीने खरेदी केली कोथिंबीर, म्हणते- बेबींच्या देठापासून ते ओरडत होते...

रस्त्यावरील आजोबांकडून मराठमोळ्या अभिनेत्रीने खरेदी केली कोथिंबीर, म्हणते- बेबींच्या देठापासून ते ओरडत होते...

अनेक टीव्ही मालिका आणि नाटकांमधून काम करत मराठमोळी अभिनेत्री राधिका देशपांडेने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. राधिका सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.  नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अनेक अपडेट्सही राधिका पोस्टद्वारे चाहत्यांना देत असते. सध्या राधिकाच्या अशाच एका पोस्टची चर्चा रंगली आहे. राधिकाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने पोस्ट लिहिली आहे. 

२२ जानेवारीला अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रामलला अयोध्येत विराजमान झाले. अयोध्येत पुन्हा रामराज्य आल्याचा सोहळा संपूर्ण देशभर साजरा केला गेला. हा ऐतिहासिक दिवस राधिकाने मात्र वेगळ्या पद्धतीने साजरा केला. राधिकाने रस्त्यावर कोथिंबीर विकणाऱ्या एका आजोबांकडून त्यांच्याजवळील सगळा माल खरेदी केला. याचा व्हिडिओ तिने शेअर केला आहे. सगळी कोथिंबीर विकली गेल्यामुळे आजोबांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसून येत आहे. 

राधिका देशपांडेची पोस्ट

दिवस मोठा होता. काल प्रभू श्री राम आले. सर्वत्र आनंद ओसंडून वाहत होता. एका कोपऱ्यात हे आजोबा बेंबीच्या देठापासून चाळीस रुपयाला एक जुडी विकायचा प्रयत्न करत होते. त्यांचा आवाज काही सेकंद माझ्या कानात घुमत राहिला. एकीकडे नाटकाच्या प्रयोगाची पहिली घंटा वाजली होती. पण हे काम मला करायचं होतं. आजच. कोणतं? व्हिडिओ बघा.

माझी आई म्हणते, “काही ठिकाणी भाव करायचा नाही. तर काही ठिकाणी भाव केल्याशिवाय काहीही विकत घ्यायचं नाही.” संपूर्ण दुकान विकत घेतलं भाव न करता. पोटासाठी काम करणारे आजोबा आज पोटभर नक्की जेवतील ह्याची सोय केली. दिवस रामाचा. काम रामाचं. एखाद्या नाटक सिनेमातला प्रसंग आठवला  “महाराज, अभिनंदन! राणी सरकारला मुलगा झाला.” मग राजा कसलाही विचार न करता त्याच्या गळ्यातली रत्नजडित माळ सुईणीला देतो. तसचं काहीसं. आनंद तर मलाही झाला होता प्रचंड. मी ही राणी सरकार असल्यासारखा आनंद लुटला. दिसेल त्याला कोथिंबीर वाटत सुटले. नाटकातल्या कलाकारांनी माझ्या ह्या कामाचे स्वागतच केले. आणि आनंदाने कोथिंबीर घरी नेली. 

आईने जे सांगितले ते माझ्या मुलीला मी सांगितलेच आहे. पण, त्यात एक जुडी आणखीन जोडीन. “अंतरा, आयुष्यात काही दिवस असे येतील त्या दिवशी भाव करायचा नाही. आणि चांगले काम केले हे सांगताना भाव खायचा नाही.
त्या आजोबांच्या घरी दिवाळी आली का नाही माहित नाही पण मी मात्र दिवाळी अशी साजरी केली. कारण दिवस मोठा होता. आणि मन मोठं का छोटं, ते कसं मोजता येईल? मनात राम होता आणि तो मनात घर करून राहिला!

राधिकाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत कौतुकाचा वर्षाव केला आहे.   राधिका अभिनेत्री असण्याबरोबरच दिग्दर्शिकाही आहे. 'सियावर रामचंद्र की जय' या बालनाट्याचं दिग्दर्शन तिने केलं आहे. 'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेत राधिका झळकली होती. 

Web Title: marathi actress radhika deshpande buys coriander from old man on road shared video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.