राम मंदिरातील बंडू दादा! मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणते- "वहिनीला त्याच्या तब्येतीची काळजी असते, पण दादाला..."
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 05:35 PM2024-05-30T17:35:32+5:302024-05-30T17:35:54+5:30
"तुझा आम्हाला अभिमान!" राम मंदिरातील मराठमोळ्या बंडू दादासाठी अभिनेत्रीची पोस्ट
काहीच महिन्यांपूर्वी राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनीही या सोहळ्याला उपस्थिती दर्शविली होती. २२ जानेवारीला रामललाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर भाविकांसाठी राम मंदिर खुलं करण्यात आलं होतं. नुकतंच मराठमोळी अभिनेत्री राधिका देशपांडे हिने अयोध्येतील राम मंदिरात जाऊन रामललाचं दर्शन घेतलं. याचे काही फोटो तिने शेअर केले आहेत. त्याबरोबरच राधिकाने राम मंदिरात काम करणाऱ्या मराठमोळ्या अविनाश संगमनेरकर यांच्यासाठी खास पोस्टही लिहिली आहे.
राधिका देशपांडेची पोस्ट
२२ मे २०२४, राम जन्मभूमी अयोध्या
रात्री १० वाजताची मंगल आरती होती. तो माझ्याकडे एक टक बघत होता. डोळे सुजले, नाक लाल झालं होतं. कारण त्याला पाहता पाहता डोळ्यातले अश्रू आकंठ वाहत होते. कंठ तर दाटून आला होताच, मेंदूच्या शिरान् शिरा ठणकत होत्या, पाय घट्ट रोवून मी त्याचे दर्शन घेत होते. तो माझ्याचकडे हसऱ्या चेहऱ्याने पाहत होता....
म्हणत असावा “काय वेडी खुळी आहेस तू, बघत काय उभी आहेस, मी आहे!” कपाट तीन वेळा उघड बंद होईसतोवर मला ब्रम्हानंदी टाळी लागली होती.आमचा बंडू दादा म्हणजेच अविनाश संगमनेरकर तिथे आरती, पूजेचं सगळं सगळं सगळं काम बघतो. २१ तरुण-तेजस्वी पंडित तयार करण्याचे काम त्याच्या कडे आहे. अशी अनेक कामं. मी त्याच्याबरोबर होते. त्यामुळे माझे अतिशय प्रेमाने आदरातिथ्य झाले. दादाचं प्रचंड मोठं काम आहे. रात्री ११:३० ते २:३० आणि दुपारी २:३० ते ५:३० काय तो घरी असतो. बाकीचा संपूर्ण वेळ रामाच्या सेवेत. वहिनीला त्याच्या तब्येतीची काळजी असते पण दादाला कसलीच काळजी नाही. तो म्हणतो माझा खारुताईचा वाटा.
त्याचा रोज सकाळी “श्रीराम जय राम जय जय राम”चा मेसेज पहाटे ४ ते ४:३० च्या दरम्यान येणार म्हणजे येणारच. कारण त्यावेळी देवाच्या पहिल्या आरतीची तयारी चोख झालेली असते. फोटोत दिसतो आहे तोच आमचा दादा. बंडू दादा, आम्हाला फार अभिमान आहे तुझा.
माफ करा पण मी श्रीरामाचा एकही फोटो काढला नाही. हे फोटो २००/४०० मीटर लांबून काढले केवळ आठवणी साठी. सूर्य, चंद्र, तारे, देवांचे भाव फोटोत तसेच्या तसे उतरत नाहीत. उतरूच शकत नाही. त्यामुळे वायफळ प्रयत्न तरी कशाला. तटस्थ उभा असलेल्या रामाचे मन:चक्षूने मी राधिका पाय चेपत बसले होते. प्रभू श्रीराम तुमची वाट पाहत उभे आहेत. त्याने बोलावण्याची वाट बघू नका. गर्दी, गर्मी, वारा, पाऊस असणारच. दोन पावलं उचला बाकीची सगळी सोय तो करतो.
ही पोस्ट जरा जास्तच आध्यात्मिक आणि भावनिक झाली नाही का? तुमचा कसा अनुभव होता मला ऐकायला आवडेल. ॥ जय श्रीराम ॥
राधिकाची ही पोस्ट चर्चेत आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. दरम्यान, राधिकाने अनेक मराठी नाटक आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. आई कुठे काय करते या गाजलेल्या मालिकेतही ती दिसली होती. राधिका अभिनेत्रीबरोबरच उत्तम लेखिका आणि दिग्दर्शिका आहे.