सायली संजीवचं टीव्हीवर कमबॅक? 'या' अभिनेत्यासोबत जमली जोडी; स्टेजवर करणार परफॉर्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 13:35 IST2025-03-02T13:32:57+5:302025-03-02T13:35:48+5:30
सायली कोणत्या अभिनेत्यासोबत दिसणार माहितीये का?

सायली संजीवचं टीव्हीवर कमबॅक? 'या' अभिनेत्यासोबत जमली जोडी; स्टेजवर करणार परफॉर्म
मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) 'काहे दिया परदेस' मालिकेतून घराघरात पोहोचली होती. २०१६ ते १७ पर्यंत ही मालिका चालली. अभिनेता ऋषि सक्सेनासोबत सायलीची जोडी चांगलीच गाजली होती. नंतर सायली मराठी सिनेमांमधून प्रेक्षकांना भेटत होती. पण आता ती पुन्हा टीव्हीविश्वात कमबॅक करणार असल्याच्या चर्चा आहेत. स्टार प्रवाहच्या आगामी पुरस्कार सोहळ्यात सायलीचा डान्स परफॉर्मन्स आहे. सायली कोणत्या अभिनेत्यासोबत दिसणार माहितीये का?
स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा येत्या काही दिवसात प्रसारित होणार आहे. सोहळा आधीच पार पडला असून काही प्रोमो आता समोर आले आहेत. यामध्ये सायली संजीवचाही डान्स परफॉर्मन्स आहे. तिचा व्हिडिओही शेअर करण्यात आला असून यामध्ये ती म्हणते, "यंदा स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात मी परफॉर्म करत आहे. खूप एनर्जेटिक गाणं आहे. तसंच यातून मी या परिवाराशीही जोडली जात आहे याचा मला खूप आनंद होत आहे. माझ्या स्टार प्रवाहवरच्या सर्व अभिनेत्री मैत्रिणींबरोबर मला स्क्रीन शेअर करायला मिळणार आहे. यानिमित्ताने आम्ही महिला वर्गाला ऊर्जा देणारं गाणं डेडिकेट करणार आहे. माझी स्टार प्रवाहवर काम करण्याची खूप इच्छा आहे. ती लवकर पूर्ण होईल असं मला वाटतंय."
सायलीने या व्हिडिओतून ती मालिकाविश्वात कमबॅक करणार असल्याची हिंटच दिली आहे. विशेष या पुरस्कार सोहळ्यात अभिनेता चेतन वडनेरेसोबत ती डान्स करणार आहे. चेतनने 'ठिपक्यांची रांगोळी' मध्ये भूमिका साकारली होती. चेतनसोबतच सायलीची मालिकाही येणार का अशी चर्चा सध्या होत आहे. स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात सायलीच्या नव्या मालिकेचं सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे.