'पारु' फेम अभिनेत्रीने पोस्ट केले लग्नाचे फोटो, 'आलिया भटचीच कॉपी' म्हणत झाली ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 12:22 PM2024-05-05T12:22:24+5:302024-05-05T12:22:58+5:30
शरयूचा लग्नातील एक लूक हुबेहुब आलिया भटसारखा असल्याचं नेटकऱ्यांच्या लक्षात आलं.
छोट्या पडद्यावर सध्या 'पारु' ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे (Sharayu Sonawane) मुख्य भूमिका साकारत आहे.या मालिकेच्या माध्यमातून शरयू अल्पावधीत लोकप्रिय झाली. प्रेक्षकांच्या या लाडक्या पारुचं खऱ्या आयुष्यात गेल्यावर्षीच लग्न झालं आहे. नुकताच अभिनेत्री शरयूने तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. या लग्नातील काही खास फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. शरयूचा लग्नातील एक लूक हुबेहुब आलिया भटसारखा असल्याचं नेटकऱ्यांच्या लक्षात आलं.
एप्रिल 2022 साली बॉलिवूडचं मोस्ट फेवरेट कपल आलिया भट आणि रणबीर कपूर लग्नबंधनात अडकले. तेव्हा आलियाने लग्नात लाल रंग न वापरता ऑफ व्हाईट रंगाची साडी नेसली होती. डोक्यावरुन पदर घेत आकर्षक ज्वेलरी तिने परिधान केली होती. पहिल्यांदाच एका अभिनेत्रीने लग्नात पांढरी साडी नेसली असेल. तेव्हा आलिया तिच्या ब्रायडल लूकमुळे ट्रोल झाली होती. आता मराठी अभिनेत्री शरयू सोनावणेने आलियालाच कॉपी केल्याचं बोललं जातंय. शरयूने लग्नात पारंपरिक लाल रंगाची नऊवारी नेसली होती. याचे फोटो तिने पोस्ट केलेत. पण शिवाय तिने लग्नात आणखी एक लूक केला होता. हा लूक अगदी हुबेहुब आलिया भटसारखा असल्याचं नेटकऱ्यांच्या लक्षात आलं. मग काय शरयूने आलियाची कॉपी केली म्हणत तिलाही आता ट्रोल करण्यात येत आहे.
शरयूने वर्षभरापूर्वी फिल्ममेकर जयंत लाडे याच्यासोबत लग्नगाठ बांधली. विशेष म्हणजे तिच्या लग्नाविषयी फारसं कोणाला ठावूक नव्हतं. 'पिंकीचा विजय असो' मालिका सोडल्यानंतर शरयूने सर्वांना लग्न करत असल्याची बातमी दिली होती. तिचा पती जयंत लाडे याने 'अ पेइंग घोस्ट','सूर सपाटा' या सिनेमांची निर्मिती केली आहे.