'तू आमची मुलगी'; शर्मिष्ठा राऊतने शेअर केला ६ महिन्यांच्या लेकीचा गोड फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 12:57 PM2022-08-19T12:57:56+5:302022-08-19T12:58:33+5:30
Sharmishtha raut: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या शर्मिष्ठाने अलिकडेच इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये तिच्यासोबत पती तेजस देसाई आणि एक चिमुकली मुलगी दिसून येत आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शर्मिष्ठा राऊत ( sharmishtha raut). असंख्य गाजलेल्या मालिकांमध्ये झळकलेली शर्मिष्ठा अलिकडेच बिग बॉस मराठी या कार्यक्रमात झळकली होती. या शोमुळे चर्चेत आलेली शर्मिष्ठा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे बऱ्याचदा ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत असते. अलिकडेच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपल्या बाळाची चाहत्यांसोबत ओळख करुन दिली आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या शर्मिष्ठाने अलिकडेच इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये तिच्यासोबत पती तेजस देसाई आणि एक चिमुकली मुलगी दिसून येत आहे. ही पोस्ट शेअर करत ही आमची लेक असल्याचं शर्मिष्ठाने म्हटलं आहे. तिच्या या वाक्यानंतर अनेकांच्या नजरा तिच्याकडे वळल्या आहेत.
"वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सीया... बघता बघता आज तू ६ महिन्यांची झालीस.. जरी तू माझी भाची असलीस तरी मला आणि तेजसला तू आमची मुलगीच आहेस.. अशीच कायम आनंदी रहा..", असं कॅप्शन शर्मिष्ठाने या पोस्टला दिलं आहे.
दरम्यान, या कॅप्शनमध्ये शर्मिष्ठाने जरी या चिमुकलीला तिची लेक म्हटलं असलं खऱ्या आयुष्यात ही शर्मिष्ठाची लेक नाही. सीया ही शर्मिष्ठाची भाची असल्याचं म्हटलं जातं. शर्मिष्ठाने ११ ऑक्टोबर २०२० रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत तेजस देसाईसोबत लग्न केलं. शर्मिष्ठाचं हे दुसरं लग्न असून यापूर्वी तिने अमेय निपाणकरसोबत लग्न केलं होतं. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. शर्मिष्ठा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने 'मन उधाण वाऱ्याचे‘, ‘जुळून येती रेशीम गाठी‘, 'कुंपण' ,'सप्तपदी', 'चार दिवस सासूचे', 'अभिलाषा', 'एक झुंज वादळाशी' या मालिकांमध्ये काम केलं आहे.