शाळेपासूनची मैत्री, मी तिला इंडस्ट्रीत आणलं; प्रसिद्धीनंतर सगळं संपलं! हिंदी अभिनेत्रीबद्दल सोनालीचं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 19:03 IST2024-02-24T19:00:32+5:302024-02-24T19:03:15+5:30
तिने मला तिच्या घरी आसरा दिला, मी तिला अभिनयात आणलं; ती हिंदी टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री बनली आणि....

शाळेपासूनची मैत्री, मी तिला इंडस्ट्रीत आणलं; प्रसिद्धीनंतर सगळं संपलं! हिंदी अभिनेत्रीबद्दल सोनालीचं वक्तव्य
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) नुकतीच साऊथच्या सिनेमात झळकली. 'मलईकोट्टई वालिबन' मध्ये तिला सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. सोनाली सध्या तिच्या प्रोफेशनल आयुष्यात बरीच उंची गाठत आहे. नुकतंच तिने एका मुलाखतीत प्रसिद्ध हिंदी टीव्ही अभिनेत्रीबद्दलची एक आठवण सांगितली जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. ज्या अभिनेत्रीला सोनालीने अभिनयात आणलं ती आज सोनालीच्या संपर्कातही नाही याची तिने खंत व्यक्त केली.
सोनाली म्हणाली, 'माझी शाळेपासूनची मैत्रीण जिच्यासोबत मी एका डब्यात जेवले आहे. जर ती कोणा दुसऱ्यासोबत डबा खायला गेली तर मी तिच्याशी बोलायचे नाही इतकी पझेसिव्ह अशी आमची मैत्री होती. मी मुंबईत करिअरसाठी आले तेव्हा ती एअर हॉस्टेस होती. तिने मला तिच्या घरी आसरा दिला. कारण माझं मुंबईत कोणीच नव्हतं. तिला फ्लाईंग इश्यू होऊ लागल्याने मीच तिला अभिनयात येण्याचा सल्ला दिला. मी तिच्यासोबत अनेक ऑडिशन्सला जायचे. तिला पोर्टफोलियोमध्ये मदत केली. आम्ही शाळेपासूनच्या घट्ट मैत्रिणी होतो."
सोनाली पुढे म्हणाली, "आज ती टीव्हीवरची प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे याचं थोडंफार श्रेय मलाही जातं. तिचं नाव आहे ससुराल सिमर का फेम दीपिका कक्कर (Deepika Kakar). आज आमच्यात काहीच संपर्क नाही. स्टारडम मिळाल्यानंतर ती व्यस्त झाली आणि माझाही मार्ग बदलला. करिअरच्या वाटेत आमची मैत्री हरवली."
दीपिका कक्कर 'ससुराल सिमर का' मालिकेमुळे घराघरात पोहोचली. मात्र ती आधी एअर हॉस्टेस होती. तेव्हाच्याच काळात मराठमोळी सोनाली कुलकर्णी तिच्यासोबत होती याचा खुलासा सोनालीच्या मुलाखतीतून झाला. आज सोनालीही यशाच्या शिखरावर आहे. तर दीपिका शोएब इब्राहिमसोबत लग्नबंधनात अडकली. तिने नुकताच मुलाला जन्म दिला.