'अशी वेळ दुश्मनांवरही येऊ नये...' सुप्रिया पाठारेंनी कठीण काळावर केलं भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 04:24 PM2024-01-04T16:24:08+5:302024-01-04T16:25:22+5:30
कॅन्सरने आईचं निधन झालं, दोन महिने हॉटेल ठप्पं होतं; नेमकं काय काय घडलं?
सुप्रिया पाठारे (Supriya Pathare) टीव्हीवरील लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहेत. सोबतच त्यांनी मुलासोबत मिळून 'महाराज' हे हॉटेल सुरु केलं आहे. मध्यंतरी हे हॉटेल दोन वेळा बंद पडलं. यानंतर सुप्रिया पाठारे आणि त्यांच्या मुलाला बरेच टोमणे ऐकावे लागले. मात्र त्या कठीण काळावर सुप्रिया यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
सुप्रिया पाठारे यांच्या 'महाराज' हॉटेलची पुन्हा एकदा दणक्यात सुरुवात झाली आहे. मध्यंतरी २ महिने हॉटेल बंद का होतं यावर त्या म्हणाल्या,'मी खूप अडचणीत होते. एकामागोमाग एक काहीना काहीतरी येतंच होतं. पहिल्या वेळी बंद झालं याचं कारण म्हणजे आमचा स्टाफच निघून गेला. ते पाचही जण एकाच गावातले होते. त्यामुळे ते जसे एकत्र येतात तसेच ते जातातही एकत्रच. त्यामुळे एकाच गावातले लोकं ठेवू नका असं मी नवीन हॉटेल व्यवसाय करणाऱ्यांना सांगेन. यामध्ये माझा सप्टेंबर महिना गेला. हे होतं तोच माझी आई कॅन्सरने गेली. मालिकेचे शेवटचे एपिसोड सुरु होते त्यामुळे त्यात व्यस्त होते. या सगळ्य़ात मी मानसिक आणि शारिरीकरित्या थकले होते.'
त्या पुढे म्हणाल्या, 'हे सगळं होऊन सुद्धा आम्ही परत हॉटेल सुरु केलं. तर पुन्हा एक अडचण आली मिहीरचा हातच भाजला. आता मिहीरच असा जखमी झाल्याने आता सुरु ठेवण्यात अर्थ नाही असं मी म्हटलं आणि हॉटेल पुन्हा बंद केलं. दिवाळी, नवरात्रीला आपलं स्वत:चं हॉटेल बंद पाहून मला खूप वाईट वाटलं. त्यामुळे तो दोन महिन्यांचा जो काळ होता ना तो खरं सांगते अशी वेळ दुश्मनावरहीव येऊ नये.'
सुप्रिया पाठारे यांनी अनेक विनोदी कार्यक्रमांमध्ये काम केलं आहे. 'होणार सून मी या घरची','ठिपक्यांची रांगोळी' यासह अनेक मालिकांमध्ये त्या झळकल्या. लवकरच त्या आणखी एका मालिकेत दिसणार आहेत. तोवर 'महाराज' हॉटेलकडे त्यांचं पूर्ण लक्ष लागलं आहे.