"तुम्ही सगळे मोठमोठ्या गाड्यांमधून फिरता, म्हणून...", खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण, अभिनेत्रीने राजकारण्यांना सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 01:31 PM2024-07-25T13:31:51+5:302024-07-25T13:32:16+5:30
रस्त्यातील खड्डे बघून मराठी अभिनेत्रीचा संताप, राजकारण्यांना सुनावलं, म्हणाली- " इलेक्शन होईपर्यंत मतदार हा आमच्यासाठी राजा, नंतर मात्र..."
गेल्या काही दिवसांपासून पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढलं आहे. पावसळ्यात रस्त्यांची होणारी अवस्था ही काही आता नवीन बाब राहिलेली नाही. दरवर्षी मुंबईतील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतं. सामान्य नागरिकांप्रमाणे अनेक कलाकारही याबाबत वेळोवेळी बोलत असतात. आताही एका मराठमोळ्या अभिनेत्रीने व्हिडिओतून पावसाळ्यात रस्त्यांची परिस्थिती दाखवली आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने संताप व्यक्त केला आहे.
अभिनेत्री सुरभी भावेने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. "नमस्कार, मी अभिनेत्री सुरभी भावे...असं म्हणतात की इलेक्शन होईपर्यंत, मतं मिळेपर्यंत मतदार हा आमच्यासाठी राजा आहे. पण, इलेक्शन झालं, निवडूण आले की म्हणतात, "मतदार गेले खड्ड्यात". आपण सामान्य नागरिक असं जे मजेने म्हणतो...ते कदाचित सगळ्याच राजकारण्यांनी खूपच मनावर घेतलेलं दिसतंय. मी असं का म्हणतेय हे मी तुम्हाला सांगते...बघा", असं म्हणत सुरभीने व्हिडिओ शेअर केला आहे. सुरभीने रिक्षातून प्रवास करताना हा व्हिडिओ शूट केला आहे. रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.
पुढे ती म्हणते, "मी शूटिंगसाठी ठाणे ते मड असा प्रवास करते. हा जो आताचा रस्ता आहे...रस्ता? सॉरी हे जे आता खड्डे जे बघितले ते मडच्या रस्त्यावर होते. एकाच प्रवासात माझी पाठ खूप दुखतेय. जे रोज प्रवास करतात...त्यांच्यासाठी खड्ड्यांमधून रस्ता शोधणं किती कठीण आहे. खूप कळकळीची नम्र विनंती. तुम्ही सगळे मोठमोठ्या गाड्यांमधून फिरता. त्याचं सस्पेन्शन खूप चांगलं असतं. तुम्हाला आमचं दु:ख नक्की काय आहे हे कळणार नाही. तुम्ही स्वत:ला सामान्य जनतेचे सेवक म्हणवता. तसं थोडंसं सेवकासारखं खरं खरं वागा...".
सुरभीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'स्वामिनी' या मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. 'राणी मी होणार' या मालिकेतही ती दिसली होती. सध्या ती 'अबीर गुलाल' मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. सुरभी 'ही अनोखी गाठ' सिनेमातही झळकली होती.