"एका रात्रीचे किती घेशील?", मराठी अभिनेत्रीला इंडस्ट्रीत आला वाईट अनुभव, म्हणाली- "C ग्रेडच्या सिनेमात..."
By कोमल खांबे | Updated: March 24, 2025 15:41 IST2025-03-24T15:40:34+5:302025-03-24T15:41:19+5:30
सिनेमात मुख्य भूमिका देतो असं सांगत अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी करण्यात आली होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला हा प्रसंग सांगितला.

"एका रात्रीचे किती घेशील?", मराठी अभिनेत्रीला इंडस्ट्रीत आला वाईट अनुभव, म्हणाली- "C ग्रेडच्या सिनेमात..."
सिनेइंडस्ट्रीतील कलाकार अनेकदा मुलाखतीतून त्यांचा स्ट्रगल सांगतात. काही सेलिब्रिटींना इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचसारख्या घटनांना सामोरं जावं लागलं आहे. मराठी अभिनेत्री आणि या राऊजी बसा भाऊजी फेम सुरेखा कुडची यांनादेखील सुरुवातीच्या काळात इंडस्ट्रीत वाईट अनुभव आला होता. सिनेमात मुख्य भूमिका देतो असं सांगत सुरेख कुडची यांच्याकडे शरीरसुखाची मागणी करण्यात आली होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला हा प्रसंग सांगितला.
सुरेखा कुडची यांनी नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत कास्टिंग काऊचचा अनुभव सांगताना त्या म्हणाल्या, "मी या इंडस्ट्रीत आले तेव्हा मला काहीच माहीत नव्हतं. माझ्या या अनुभवातून नवीन मुलींना बोध घेण्यासारखं आहे. सुरुवातीच्या काळात आरामनगरमध्ये असलेल्या एका ऑफिसमध्ये मी गेले होते. त्या ऑफिसमध्ये काही हॉरर सिनेमांचे पोस्टर लावले होते. त्या फिल्म सी ग्रेडच्या असतात हे मला माहितच नव्हतं. सी ग्रेड, ए ग्रेड हे काहीच मला माहीत नव्हतं. त्या पोस्टरवर २-३ चेहरे माझ्या ओळखीचे होते. त्यामुळे आपण योग्य ठिकाणी आलोय असं मला वाटलं. मी जाऊन बसले. त्यांनी मला स्टोरी वगैरे सांगितली. ते मला म्हणाले की आम्ही तुम्हाला मुख्य भूमिका देत आहोत. तर त्या बदल्यात तुम्ही आम्हाला काय द्याल?".
पुढे त्या म्हणाल्या, "मला काहीच माहीत नव्हतं. मला असं वाटलं की याला आपण पैसे द्यायचे मग हा आपल्याला रोल देणार. मी त्यांना म्हटलं ती माझ्याकडे पैसे नाहीत. तुम्ही पण मला पैसे देऊ नका मी फुकटमध्ये काम करेन. पण, मला काम हवंय. त्याला कळलं की हिला काहीच कळत नाहीये. मग त्याने मला डायरेक्ट विचारलं की तू एका रात्रीचे किती पैसे घेतेस? मला तरीही काही कळलं नाही. मी त्यांना म्हटलं की तुम्ही जितके द्याल तितके मी घेईन. मग त्याला कळलं की हिला यातलं काहीच माहीत नाही. मग त्याने मला सविस्तर सांगितलं. ते ऐकल्यानंतर माझ्या हृदयाचे ठोके वाढले. त्याच्यासमोर माझ्या फोटोंचा अल्बम पडलेला होता. मी तो उचलला आणि पळत सुटले. त्यानंतर मी बाहेर जाऊन एवढी रडले. हे अनुभव मी सुरुवातीच्या काळात घेतले आहेत. पण, आता मला कोणी विचारायची हिंमत करणार नाही".