पियुषसोबत लग्न केल्यावर आल्या निगेटिव्ह कमेंट्स; सुरुची म्हणाली, "खूप विचारपूर्वक..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 11:20 IST2025-01-29T11:19:49+5:302025-01-29T11:20:16+5:30
पियुष रानडेचं हे तिसरं लग्न आहे. दोघांना बऱ्याच ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. यावर सुरुची पहिल्यांदाच स्पष्ट बोलली आहे.

पियुषसोबत लग्न केल्यावर आल्या निगेटिव्ह कमेंट्स; सुरुची म्हणाली, "खूप विचारपूर्वक..."
'का रे दुरावा' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरुची अडारकर (Suruchi Adarkar). सुरुचीने २०२३ साली अभिनेता पियुष रानडेसोबत (Piyush Ranade) लग्नगाठ बांधली. पियुषचं हे तिसरं लग्न असल्याने सुरुचीला खूप ट्रोल केलं गेलं. त्यांच्या लग्नाच्या फोटोंवर लोकांनी बरेच निगेटिव्ह कमेंट्स केले होते. सुरुचीने आता नुकतंच पहिल्यांदाच या सगळ्यावर भाष्य केलं आहे. पियुषसोबत लग्नाचा निर्णय हा विचारपूर्वकच घेतला होता. तसंच तो माणूस म्हणून अजून लोकापर्यंत पोहोचलाच नाही असंही ती एका मुलाखतीत म्हणाली.
'रेडिओ सिटी मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत सुरुचीला लग्नाच्या निर्णयावर झालेलं ट्रोलिंग अपेक्षित होतं का असं विचारण्यात आलं. यावर ती म्हणाली, "मला हे अपेक्षित होतंच. कारण आजपर्यंत पियुष कोणापर्यंत माणूस म्हणून पोहोचलाच नाही. तो बोलतच नाही. आमच्या रिलेशनशिपमध्ये सुरुवातीला मला त्याला खूप गोष्टी विचाराव्या लागायच्या. मी त्याच्याशी बोलायचे, संवाद साधायचे. त्याला मी बोलण्याची सवय लावली. मी त्याला बोलत केलं."
लोक हल्ली तसेही खूप जजमेंटल झाले आहेत. त्यामुळे याचं मला कधीच वाईट वाटत नाही. तसंच कोणीतरी स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे जे मी आहे. मला माझ्या निर्णयांवर खूप विश्वास असतो. मी केल्यानंतर विचार करत नाही तर आधीच करते.त्यामुळे तो निर्णय मी खूप विचारपूर्वक घेतला होता. आज आपण कोणालाही बघून सहज बोलतो अरे हे कसं असं केलं यांनी पण तुम्ही जे बोलताय ते ते लोक जगत आहेत. म्हणजेच त्यांनी याचा विचार आधीच केला नसेल का? केलाच असणार ना"
आम्ही आमच्या नात्याबद्दल कोणालाच सांगितलं नव्हतं. फक्त जवळच्या लोकांनाच माहित होतं. आम्हाला याची चर्चा होऊ द्यायची नव्हती. म्हणून आम्ही ठरवलं की की लग्नाच्या दिवशी पोस्ट टाकायची. आपल्या आयुष्यातली महत्वाची घटना लोकांपर्यंत आदरपूर्वकच पोहचली पाहिजे. खूप लोक बरंच काय बोलले आजही बोलतात. इंडस्ट्रीमधून उलट असेच फोन आले की आम्हाला खूप छान वाटलं.आम्ही ठरवलं की आपला निर्णय आहे. कोणाला काही सिद्ध करण्याची गरज नाही. यात आई वडिलांचा तर सगळ्यात मोठा पाठिंबा होता. आम्ही कमेंट्सचा परिणाम होऊ दिला नाही."
सुरूची आणि पियुष हे 'अंजली' मालिकेच्या सेटवर भेटले होते. त्यांच्यात तेव्हा फक्त मैत्री होती. मालिका संपल्यानंतर काही वर्षांनी ते प्रेमात पडले. ६ डिसेंबर २०२३ रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली.