'मुंबई' ने आपलं म्हटलं बुवा एकदाचं...', अश्विनी कासारनं खरेदी केलं नवीन घर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 19:46 IST2023-12-18T19:43:48+5:302023-12-18T19:46:54+5:30
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अश्विनी कासारनं स्वत:च्या हक्काचं घर खरेदी केलं आहे.

'मुंबई' ने आपलं म्हटलं बुवा एकदाचं...', अश्विनी कासारनं खरेदी केलं नवीन घर!
स्वत:च्या हक्काचं घर खरेदी करणं हे अनेकांचं स्वप्न असतं. हेच स्वप्न मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अश्विनी कासारनं पूर्ण केलं आहे. उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अश्विनीने तिच्या स्वप्नातलं घर खरेदी केलं आहे. अश्विनीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या या नव्या घराची झलकसुद्धा दाखवली आहे.
अश्विनी कासारनं पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहले, 'आपण काम करत असलेल्या क्षेत्रामुळे आणि काम करतोय त्या शहरात हक्काचं स्वतःचं घर होणं....... हे एकतर स्वप्न आहे किंवा कधी काळी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरलंय...!! खूप संमिश्र भावना आहेत. माझ्या वाढदिवशी आनंद द्विगुणीत करणारी गोष्ट तुम्हा सगळ्यांनाही सांगण्यासाठी हा शब्दप्रपंच.काही वर्षांपूर्वी बदलापूरपासून सुरु झालेल्या माझ्या प्रवासामुळे दिवसाच्या शेवटी माझ्या राहत्या घरापर्यंत मी पोहोचू शकायचे नाही. पण माझ्या मित्र मैत्रिणींनी, त्यांच्या (आणि आता माझ्याही) कुटुंबियांनी, नातेवाईकांनी मला घराची उणीव कधी जाणवू दिली नाही'.
पुढे ती म्हणाली, 'नुसतं घरच नाही तर ‘घरपण’ सुद्धा दिलं. त्यासाठी मी त्यांची कायम ऋणी आहे. तरीही माझ्या एकत्र कुटुंबाच्या प्रेमापोटी आणि ‘आपलं घर ते आपलं घर’ या भावनेपोटी मी बदलापूर गाठायचे. आज रात्री बेरात्री केलेले प्रवास, तब्येतीच्या तक्रारी, मनावर दगड ठेवून घेतलेले निर्णय आणि तरीही अभिनय क्षेत्रावरचं प्रेम, कामाप्रती श्रद्धा, जिद्द, आसू आणि हसू हे सगळं सगळं आठवतंय'.
'सगळं ‘Worth’ वाटतंय. आता कंबर कसून जास्त छान काम करू ही ताकद या घराने दिली आहे. ‘मुंबई’ ने आपलं म्हटलं बुवा एकदाचं असं काहीसं वाटतंय..!! माझ्या घर मिळण्याच्या प्रवासात खूप जणांनी मदत केली आहे. त्या सगळ्यांचे मनापासून आभार. म्हाडा आणि महाराष्ट्र शासनाचे आभार..!! तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम यांच्या प्रतीक्षेत मी आणि माझं घर कायम असू..!! भावना समजून घ्याल याची खात्री आहे..!!'. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. अश्विनी अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम नृत्यांगना आणि लेखिकादेखील आहे.