"कधी-कधी जीव तोडून काम करुनही...", मराठी अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाला-" तेव्हा त्रास..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 14:40 IST2025-03-03T14:39:18+5:302025-03-03T14:40:42+5:30
गणेश मयेकर (Ganesh Mayekar) हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत.

"कधी-कधी जीव तोडून काम करुनही...", मराठी अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाला-" तेव्हा त्रास..."
Ganesh Mayekar: गणेश मयेकर (Ganesh Mayekar) हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. वेगवेगळे मराठी व हिंदी चित्रपट, मालिका, नाटके तसेच जाहिरातींमध्ये काम करुन त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला. 'एक होतं पाणी', 'चिंटु-२' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या अभिनय प्रवासावर भाष्य केलं. त्यावेळी गणेश मयेकर यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले.
नुकतीच गणेश मयेकर यांनी 'इट्स मज्जा'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी अभिनय क्षेत्रात काम करताना आलेल्या वाईट अनुभवांवर भाष्य केलं. एक कलाकार म्हणून आपल्या कामाची दखल घेतली गेली नाही याची खंत वाटते का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, "हो, खंत तर वाटतेच. कधी कधी असं होतं की आपण जीव तोडून काम केलेलं असतं आणि आपली दखल घेतली जात नाही. बऱ्याच प्रोडक्शन हाऊसमधून ऑडिशन्स मागवल्या जातात. त्यामध्ये शॉर्टलिस्ट होऊनही तसेच पैशांचं बोलणंही होतं आणि त्यानंतर आपलं काम जातं."
पुढे अभिनेते म्हणाले, "त्याच्यानंतर मी १-२ लोकांना असंच विचारलं. कारण कुठल्या ना कुठल्या प्रोडक्शन हाऊसमध्ये आपले मित्र असतात. त्यावेळी मग त्यांच्याकडून कळतं की, दिग्दर्शकाचा कोणी मित्र होता, त्याला दाखवण्यासाठी माझा ऑडिशनचा व्हिडीओ मागवला होता असं समजतं. अशा गोष्टी सुद्धा घडल्या आहेत. आपल्याकडून व्हिडीओ मागवायचा आणि तो व्हिडीओ पाहून तसंच कॅरेक्टर करायला सांगायचं. या गोष्टींमुळे आपलं काम थोडक्यात गेलं हे जेव्हा कळतं तेव्हा त्रास होतो."
दरम्यान, गणेश मयेकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर अलिकडेत ते 'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी' चित्रपटात झळकले. याशिवाय त्यांनी बऱ्याच मालिकांमध्येही काम केलं आहे.