'मराठी पाऊल पडते पुढे' वाद्यवृंद कार्यक्रमाचा ४००० वा प्रयोग थाटात पार पडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 08:34 AM2023-08-01T08:34:20+5:302023-08-01T08:35:47+5:30
हा कार्यक्रमाचा ३२ वा वर्धापनदिन देखील असणार आहे.
'कलारंजना' मुंबई यांच्या संकल्पनेतून दिग्दर्शित केलेल्या'मराठी पाऊल पडते पुढे' या वाद्यवृंद कार्यक्रमाचा विक्रमी ४००० वा प्रयोग लवकरच पार पडणार आहे. हा कार्यक्रमाचा ३२ वा वर्धापनदिन देखील असणार आहे. रविवारी ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता परळच्या दामोदर हॉल येथे कार्यक्रम संपन्न होणार आहे. रसिकांना या कार्यक्रमाची आतुरता आहे.
८ ऑगस्ट १९९१ रोजी दामोदर हॉलमध्येच वाद्यवृंद कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र तसंच गोवा, दिल्ली, मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक, हिमाचल प्रदेश या राज्यात देखील मराठी संस्कृतीचा ठसा उमटवला. गोव्यात तर कार्यक्रमाचे आतापर्यंत तब्बल २८७ प्रयोग झाले आहेत. नुकताच सादर झालेला ३९९९ वा प्रयोग तर G-2 परिषदेच्या निमित्ताने आलेल्या परदेशी निमंत्रितांकरिता सादर केला गेला.
गणेश स्तवनाने सुरु होणारा हा सोहळा मग अभंग, दिंडी, शेतकरी नृत्य , ठाकर नृत्य, जोगवा ,गोंधळ, लावणी,पोवाडा,कोळी नृत्य यासारख्या प्रमुख लोककलांचा प्रवास संपूर्ण कार्यक्रमात घडताना दिसतो. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण अर्थातच 'मराठी पाऊल पडते पुढे' या शीर्षक गीतावर आधारित छत्रपती शिवाजी महाराज यांचं विलोभनीय दर्शन आणि या गीतावरील रोमांचकारी सादरीकरण हे आहे.
४००० वा प्रयोग सादर करताना या कार्यक्रमांमधून जवळ जवळ २०० कलावंतांनी आपली कला सादर केली आहे. निर्माते उदय साटम, सहनिर्माती सौ. ज्योती उदय साटम आणि त्यांचा वारसा पुढे चालवणारा सुपूत्र दर्शन उदय साटम हे मात्र या साऱ्या प्रवासाचं श्रेय कलावंत आणि टीम वर्कला देतात.