नेहासमोर येणार यशचं सत्य; आजोबा- समीरच्या नाटकावरचा पडदा सिम्मी करणार दूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 17:38 IST2021-11-02T17:38:55+5:302021-11-02T17:38:55+5:30
Majhi tujhi reshimgaathi: यश कंपनीचा खरा मालक आहे हे सिम्मीमुळे ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना लवकरच कळेल. परंतु, नेहाला समजल्यानंतर तिची नेमकी प्रतिक्रिया काय असेल?

नेहासमोर येणार यशचं सत्य; आजोबा- समीरच्या नाटकावरचा पडदा सिम्मी करणार दूर
काही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय होतात. उत्तम कथानक आणि त्याला मिळालेली कलाकारांच्या अभिनयाची जोड यामुळे अनेक मालिका तुफान गाजतात. त्याचसोबत त्या प्रेक्षकांच्या स्मरणातही राहतात. अशीच एक मालिका म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ'. काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेली ही मालिका सध्या लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. हळूहळू या मालिकेतील कथानक पुढे सरकत असून ती दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. यात नेहा आणि यश यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खासकरुन आवडत आहे. मात्र, आता या मालिकेत एक नवा ट्विस्ट येणार आहे.
कंपनीतील कारभार, तेथील स्टार नेमका कशा प्रकारे काम करतो हे जवळून पाहण्यासाठी यश, समीर आणि आजोबा यांनी एक प्लॅन आखल्याचं साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यानुसार, यश ऑफिसमध्ये एक साधा कर्मचारी म्हणून वावरत आहे. तर, समीर कंपनीचा मालक असल्याचं भासवत आहे. नेहासमोरदेखील हेच चित्र असल्यामुळे ती यशला तिचा सहकारी आणि समीरला बॉस समजते. परंतु, तिच्यासमोर या दोघांचही सत्य समोर येणार आहे. सीमा अर्थात सिम्मी हे सत्य समोर आणणार आहे.
नेहाचं होणार परांजपे वकिलांसोबत लग्न? बंडू काका-काकूंना दिलं वचन
झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये घारतोंडे ऑफिसमध्ये सुरु असलेला गोंधळ सिम्मीच्या कानावर घालणार आहे. त्यामुळे सिम्मी आता एक महत्त्वाचं पाऊल उचलणार असून ती लवकरच यांचं बिंग फोडणार असल्याचं शक्यता दिसून येत आहे.
दरम्यान, यश कंपनीचा खरा मालक आहे हे सिम्मीमुळे ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना लवकरच कळेल. परंतु, नेहाला समजल्यानंतर तिची नेमकी प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. नेहा आणि यशमध्ये चांगली मैत्री आहे. मात्र, यशचं सत्य समोर आल्यानंतर त्यांच्यातील मैत्री कायम राहिल का? हा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे.