मराठी तारका उन्हाळ्यात अशी घेतात काळजी !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2017 12:25 PM2017-04-13T12:25:09+5:302017-04-13T18:26:29+5:30
-Ravindra More सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून सामान्यांपासून उच्च वर्गीयांपर्यंत सर्वचजण उन्हापासून वाचण्यासाठी हवा तो उपाय करताना दिसत आहेत. ...
सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून सामान्यांपासून उच्च वर्गीयांपर्यंत सर्वचजण उन्हापासून वाचण्यासाठी हवा तो उपाय करताना दिसत आहेत. कोणी बाहेर पडताना डोक्यावर टोपी, छत्री, डोळ्यांवर सनग्लास तर कोणी तोंडावर मास्क आदींचा वापर करुन आपले शरीराचे उन्हापासून संरक्षण कसे होईल याची काळजी घेताना दिसत आहेत. मात्र एवढ्या कडक उन्हातही आपल्या लाडक्या मराठी तारका शुटिंग करीत असतात. त्या अशावेळी स्वत:चा उन्हापासून कसा बचाव करतात म्हणजे कशा काळजी घेतात, याबाबत त्यांच्याशी सीएनएक्सने साधलेला संवाद त्यांच्या शब्दात...
* खुशबू तावडे
‘एक मोहोर अबोल’, ‘तू भेटशी नव्याने’, ‘पारिजात’, ‘प्यार की एक एक कहानी’ तसेच ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या टीव्ही मालिकांमधून घराघरात पोहोचलेली खुशबू तावडे उन्हाळ्यात स्वत:ची विशेष काळजी घेताना दिसत आहे. खुशबू या दिवसात ११ ते ४ दरम्यान कडक उन्ह असल्याने बाहेर पडतच नाही. शुटिंगचे शेड्यूलही एकतर सकाळी नाहीतर संध्याकाळीच ठरवते. शरीरात पाण्याचे संतुलन राहावे म्हणून सब्जाचे पाणी पिते. एक्सरसाइज, रनिंग, योगाला प्राधान्य देते. तसेच जर उन्हात जावेच लागले तर सनस्क्रिनचा वापर करते. शिवाय डोळ्यांवर सनग्लास, छत्री तसेच त्वचा पूर्ण झाकली जाईल जेणेक रून त्वचेवर सूर्याचे किरणे पडणार नाहीत याची काळजी आवर्जून घेते.
* अक्षया गुरव
‘मानसिचा चित्रकार’ आणि ‘मेंदीच्या पानावर’ या टीव्ही मालिकांमधून आपल्या अभिनयाने सर्वांची लाडकी बनलेली अक्षया गुरव उन्हाळ्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेत असते. ती देखील शुटिंगला जाताना कडक उन्हादरम्यान म्हणजेच दुपारी ११ ते ४ दरम्यानची वेळ टाळतेच. तिने शुटिंगची वेळही सकाळी ८ ते १० दरम्यानचीच ठेवली आहे. विशेष म्हणजे उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून आपल्या डायट मध्ये फळांबरोबरच काळी मिरी, तुळशीचे पान आणि हळद एकत्र करुन तयार करण्यात आलेला काढ्याचा समावेश करते. शुटिंगला जाण्याअगोदर ती हा काढा पिऊनच जाते. शिवाय संध्याकाळी जास्त खाणे टाळते. तसेच पुढे जास्त त्रास होऊ नये म्हणून लवकरच ग्रीन टीचे सेवन करणार असल्याचेही तिने सांगितले. तसेच योगा क्लासही जॉइन करणार आहे.
ऋजुता देशमुख : आवली (तू माझा सांगाती)
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच गरमी खूपच वाढल्याने खाण्या-पिण्यावर खूपच बंधन आली आहेत. त्यातून रोज शूट असल्याने खूप काळजी घ्यावी लागते. मी सकाळी ३-४ थेंब लिंबाचे पिळून थोडं गरम पिते. दिवसभर भरपूर पाणी पिणे हा एक उत्तम उपाय आहे असं मला वाटत. ११ ते १२ वाजताच्या दरम्यान मी लिंबू सरबत किंवा कोकम सरबत पिते. आऊट डोर शूट असेल तर टँग किंवा एनर्जी ड्रिंक मी माझ्याजवळ ठेवते. रोज ४ वाजता ताक पिते. दिवसभरात एक ते दोन फळे खाते, त्यात कलिंगड व संत्रीचा समावेश असतो. गरम तापमानातून थंड तापमानात जाणं मी टाळते आणि उन्हातून आल्यावर ‘एसी’ थोड्यावेळ बंद ठेवते.
तितिक्षा तावडे (सरस्वती)
या उन्हाळ्यामध्ये ‘डिहायड्रेशन’ होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते आहे. रोज न चुकता शहाळ्याचे पाणी पिणे, त्याचप्रमाणे नकळत जमेल तसे तासा-अर्ध्या तासाने पाणी पीत राहणे, तहान लागण्याची वाट न बघता हे खूपच महत्वाचे आहे. उन्हात शूट असेल तर ग्लूकोन डी ची बाटली मी जवळ ठेवते, आणि जेवणानंतर दोन तासांनी ताक पीते. डॉक्टरने सांगीतल्याप्रमाणे विटॅमिन सी ची गोळी मी रोज घेते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे रोज घरातून निघताना सनस्क्रीन लावल्याशिवाय अजिबात बाहेर पडत नाही.