"जोपर्यंत आपल्या आई, बहिणींसोबत...", स्वारगेट अत्याचार प्रकरणावर मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला-"लाज वाटते..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 11:13 IST2025-02-27T11:07:30+5:302025-02-27T11:13:47+5:30

पुणे हादरले असून, राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

marathi television actor adish vaidya reaction on pune swargate shivshahi bus rape case shared video | "जोपर्यंत आपल्या आई, बहिणींसोबत...", स्वारगेट अत्याचार प्रकरणावर मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला-"लाज वाटते..."

"जोपर्यंत आपल्या आई, बहिणींसोबत...", स्वारगेट अत्याचार प्रकरणावर मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला-"लाज वाटते..."

Pune Swargate Rape Case: विद्येचे आणि संस्कृतीचे माहेरघर असा लौकिक असलेल्या पुण्यातील (Pune) स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये २६ वर्षाच्या तरुणीवर एका नराधमाने अमानुष बलात्कार केला. मंगळवारी पहाटे घडलेल्या या पाशवी घटनेने लाडक्या बहिणींच्या सुरक्षेची लक्तरे वेशीवर टांगली गेल्याने पुणे हादरलेम्ह असून, राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. सध्या या घटनेमुळे सगळीकडे वातावरण प्रचंड तापलं आहे. अशातच आता मराठी कलाकार मंडळी देखील याप्रकरणावर आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना दिसत आहेत.


नुकताच सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत या प्रकरणावर अभिनेता आदिश वैद्यने (Adish Vaidya) आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. त्याच्या या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्याने  भारतीय न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. याचदरम्यान व्हिडीओमध्ये त्याने म्हटलंय, "आपली न्यायव्यवस्था इतकी कमकुवत  झाली आहे का? की या प्रकरणाची कोणीही नोंद घेत नाही. याबद्दल कोणीही चर्चा करत नाही. एखाद्या रिअॅलिटी शोमध्ये घडलेल्या गोष्टी त्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. मग अशा गोष्टींची दखल का घेतली जात नाही? याचा संताप होऊ लागला आहे. प्रशासन काय करत आहे? यावर मला नेहमीच प्रश्न पडतो. स्वारगेटला एका बसमध्ये एका मुलीला दरवाजा बंद करुन कोंडलं जातं आणि तिच्यावर अत्याचार होतो. हे किती भीषण आहे,  असं तुम्हाला वाटत नाही का?"

पुढे अभिनेत्याने म्हटलंय, "आपण हे फक्त बघत बसतो आणि गोष्टी घडत जातात. त्यामुळे लोकांना याबद्दल काहीच वाटत नाही. जोवर आपल्या घरी आपल्या आई, बहिंणींसोबत काही होत नाही तोवर आपल्याला दुसऱ्यांच्या यातना, दु:ख आपल्याला कळतच नाही, असं आहे का? खूप वाईट वाटतं मला हे बोलताना. पण, मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये अनेकांना असंच वाटतं. जोपर्यंत आपल्या घरात अशा गोष्टी घडत नाही तोपर्यंत चलता है चलने दो... पण, ती वेळ लांब नाही आहे. कारण, या गोष्टी तुमच्या घरापर्यंत येतील तेव्हा तुम्ही रडत बसाल. "

कठोर शिक्षा द्यावी

या व्हिडीओमध्ये प्रशासनाला विनंती करत तो म्हणाला, "बस्स झालं आता. या आरोपींना आता कायद्यानुसार कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्यांनी फाशी दिली पाहिजे. त्याशिवाय या देशाचं भलं होऊ शकत नाही. मी मरेपर्यंत त्या दिवसाची वाट बघेन की हा नॅशनल इश्यू कधी बनेल. याबाबतीत कधीतरी कुणी पुढे येऊन काहीतरी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल. मला या गोष्टीची लाज वाटते. खरंच माझं माझ्या देशावर खूप प्रेम आहे. परंतु या गोष्टी बघताना खरोखर खूप अजीर्ण वाटतं, लाज वाटते. त्यामुळे माझी पोलिसांना, न्यायव्यवस्थेला विनंती आहे की त्यांनी काहीतरी यावर लवकरात लवकर कारवाई करावी...!" अशा शब्दांत अभिनेत्याने संताप व्यक्त केला आहे. 

Web Title: marathi television actor adish vaidya reaction on pune swargate shivshahi bus rape case shared video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.