VIDEO: "खड्ड्यांच्या नावाने...", 'तुला शिकवीन चांगलाच धडा' फेम अभिनेत्याची उपरोधिक पोस्ट, व्यक्त केला संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 10:01 IST2025-01-07T09:59:04+5:302025-01-07T10:01:50+5:30
मराठी अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी सोशल मीडियावर एक लक्षवेधी व्हिडीओ पोस्ट केला आहे.

VIDEO: "खड्ड्यांच्या नावाने...", 'तुला शिकवीन चांगलाच धडा' फेम अभिनेत्याची उपरोधिक पोस्ट, व्यक्त केला संताप
Swapnil Rajeshekhar: रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतुककोंडीचा सामना प्रत्येकाला करावा लागतो. शिवाय यामुळे अनेकांची गैरसोय सुद्धा होते. यावर वेगवेगळ्या माध्यमातून लोक व्यक्त होत असतात. कलाकार मंडळी देखील अशा सामाजिक प्रश्नांवर सोशल मीडियाद्वारे व्यक्त होताना दिसतात. दरम्यान, अशातच 'तुला शिकवीन चांगलाच धडा' फेम अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओने नेटकऱ्यांचं पुन्हा एकदा लक्ष वेधलं आहे. स्वप्नील राजशेखर आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. नुकताच त्यांनी एका प्रवासादरम्यानचा व्हिडीओ पोस्ट करत रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.
स्वप्नील राजशेखर यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करून आपल्या कोल्हापुरी शैलीत शाब्दिक फटकेबाजी करत सुनावलं आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणतात, "हे जे लोक रोज सकाळी उठून प्रवास करताना खड्ड्यांच्या नावाने शिव्या देतात. शिवाय रस्त्यावरील खड्ड्यांच्या नावाने बोटं मोडतात. त्या सगळ्या माणसांना मला एक सांगायचंय, अहो! वर्षानुवर्षे, महिनोंमहिने हे जे खड्डे जपलेले आहेत, राखलेत हे सगळं उगाचंच नाहीये. त्याच्यामागे एक विचार आहे. किती अशी लोक आहेत ज्यांचं गुळगुळीत रस्त्यांप्रमाणे आयुष्य आहे? तुमच्या-माझ्या रोजच्या जगण्यामध्ये खड्डे-डबरे कमी आहेत का? अहो, महागडी गाडी खरेदी केलेली असते, हेल्थ विमा काढलेला असतो. दर महिन्याला याचा हफ्ता भरायचा असतो. दर वीकेंडला बायको-मुलांना घेऊन हिल स्टेशनला थंड हवेच्या ठिकाणी घेऊन जावं लागतं. किती मोठा खड्डा पडतो. मावस मेहुणीला महागडं गिफ्ट द्यावं लागतं तसंच आपलं पोरगं पहिलीतून दुसरीत जाताना इंग्रजी शाळेची फी भरावी लागते या सगळ्यात मागे हटून चालणार नाही, म्हणून हे खड्डे."
"आता परवाची गोष्ट घ्या आमच्या गावातील, कोल्हापुरातील एक आजोबा गेले असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यांचा मृतदेह अॅंब्यूलन्समधून लोक घरी घेऊन जात होते. त्यावेळी वाटेत एक खड्डा आला आणि अॅंब्यूलन्स आदळली मग ते आजोबा दाणकन् उठून बसले. गेलेला माणूस परत आला. लक्षात घ्या, एका माणसाचा जीव या खड्ड्यांमुळे वाचला, लोक उठतात आणि रस्ते बाद आहेत म्हणून शिव्या घालतात पण, आता आपणच समजलं पाहिजे. प्रत्येकाच्या आयुष्यात खड्डा पाहिजे म्हणून तो ठेवलाय." अशी पोस्ट शेअर करत अभिनेत्याने प्रशासनाला चिमटा काढला आहे.