"तुझा आवाज नाचायलाच लावतो...", 'छावा'साठी मराठी अभिनेत्रीने केलं वैशाली सामंतचं कौतुक; म्हणाली...
By सुजित शिर्के | Updated: February 26, 2025 10:06 IST2025-02-26T10:02:26+5:302025-02-26T10:06:50+5:30
सध्या देशभरात लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' (Chhaava) सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे.

"तुझा आवाज नाचायलाच लावतो...", 'छावा'साठी मराठी अभिनेत्रीने केलं वैशाली सामंतचं कौतुक; म्हणाली...
Madhuri Pawar Post: सध्या देशभरात लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' (Chhaava) सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात अभिनेता विकी कौशलसह (Vicky Kaushal) रश्मिका मंदानाची मुख्य भूमिका आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचा बोलबाला आहे. 'छावा'प्रमाणे त्यातील गाणी सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. दरम्यान, त्यातील 'आया रे तुफान' या गाण्याची प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ आहे. ए आर रेहमान यांचं संगीत, त्यांचा आवाज आणि सोबतीला मराठमोळी गायिका वैशाली सामंतने सुरेल साथ दिली आहे. त्यामुळे हे गाणं प्रेक्षकांसाठी एक म्युझिकल ट्रिट ठरलं आहे. याचनिमित्ताने मराठी अभिनेत्री माधुरी पवारने वैशाली सामंत यांच्या भेटीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. शिवाय वैशाली सामंत (Vaishali Samant) यांचं भरभरुन कौतुक केलं आहे.
नुकतीच माधुरी पवारने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ही पोस्ट शेअर करून कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, "वैशाली ताई..., तुझा आवाज हा मला कधीच अनोळखी नव्हता. कारण, नृत्य करताना लहानपणी तुझीच गाणी निवडली. तुझा आवाज नाचायलाच लावतो. पण आज काहीतरी वेगळं सांगायचं आहे तुला. तुझ्यासाठी खूप आनंद वाटतोय गं! इतके वर्ष झालं तू प्रेक्षकांना भरभरून दिलंस आणि आज ती वेळ आलीये की प्रेक्षकांनी तुला डोक्यावर घेतलंय, " छावा" चित्रपतील तू गायलेलं गाणं प्रत्येकाच्या मनावर राज्य करतंय आणि करत राहिलच. तू मोठी आहेसच पण अजून खूपच मोठी हो…,पण मी अशीच पप्पी घेणार तुझी बरं का...," अशी पोस्ट शेअर करत अभिनेत्री वैशाली सामंत यांचं कौतुक केलं आहे.
वर्कफ्रंट
दरम्यान, माधुरी पवारच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, माधुरी उत्तम अभिनेत्री आहेच त्याशिवाय ती एक उत्कृष्ट नृत्यांगना देखील आहे. 'तुझ्यात जीव रंगला', 'रान बाजार', आणि देवमाणूस' या मालिकांमध्ये माधुरी पवार महत्त्वाच्या भूमिकेत दिसली आहे. त्याबरोबरच 'इर्साल', 'एक नंबर', 'अल्याड पल्याड', लंडन मिसळ अशा चित्रपटांमध्ये सुद्धा अभिनेत्रीने काम केले आहे.