शिवानी-अंबरची लगीनघाई! 'रंग माझा वेगळा' मालिकेच्या टीमने पारंपरिक पद्धतीने साजरं केलं केळवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 15:36 IST2025-01-07T15:31:26+5:302025-01-07T15:36:02+5:30
मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय कलाकार, अभिनेत्री शिवानी सोनार अन् अंबर गणपुळे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

शिवानी-अंबरची लगीनघाई! 'रंग माझा वेगळा' मालिकेच्या टीमने पारंपरिक पद्धतीने साजरं केलं केळवण
Shivani Sonar Wedding: मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय कलाकार अभिनेत्री शिवानी सोनार अन् अंबर गणपुळे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. शिवानी 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेता अंबर गणपुळेसोबत लग्न करून नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच त्यांची बॅचलर पार्टी दणक्यात पार पडली. शिवाय सोशल मीडियावर पोस्ट करत शिवानीने तिच्या घरी लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाल्याचे संकेत दिले होते. आता येत्या काही दिवसात शिवानी-अंबर आयुष्यभरासाठी एकत्र येतील. दरम्यान, नुकतंच शिवानी आणि अंबरचं दुसरं केळवण साजरं करण्यात आलं, याचा व्हिडीओ अभिनेत्रीने इन्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केला आहे.
शिवानी-अंबरच्या केळवणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. विशेष म्हणजे 'रंग माझा वेगळा' मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या केळवणासाठी खास नियोजन केलं होतं. दरम्यान शिवानी सोनारने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये अभिनेत्री हर्षदा खानविलकर, रेश्मा शिंदे, विदिशा म्हसकर तसेच आशुतोष गोखले हे 'रंग माझा वेगळा' या मालिकेतील कलाकार एकत्र दिसत आहेत. "हॅशटॅग अंबर-शिवानीचे केळवण..." असं कॅप्शन देत या कलाकार मंडळींनी त्यांचे फोटो शेअर केल्याचे पाहायला मिळतायत. त्यामुळे शिवानी-अंबरचे चाहते त्यांच्या लग्नासाठी प्रचंड उत्सुक आहेत.
दरम्यान, गेल्या वर्षी गुढीपाढव्याच्या शुभमुहूर्तावर ९ एप्रिल २०२४ या दिवशी शिवानी सोनार आणि अंबर गणपुळेचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर त्यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होऊ लागली. आता लवकर शिवानी-अंबर लग्नबेडीत अडकणार आहेत.