यशने भररस्त्यात दिली प्रेमाची कबुली; पण सत्य समजल्यामुळे नेहा देईल का त्याला होकार?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 05:08 PM2021-12-31T17:08:37+5:302021-12-31T17:09:40+5:30
Mazi tuzi reshimgath: सध्या सोशल मीडियावर यश आणि नेहाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये यश नेहासमोर त्याच्या प्रेमाची कबुली देण्यासाठी प्रयत्न करत आहे.
'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका सध्या रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. एकीकडे नेहाचं परांजपेंसोबत ठरलेलं लग्न मोडलं आहे. तर दुसरीकडे यश, नेहासमोर त्याच्या प्रेमाची कबुली देणार आहे. परंतु, या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा परांजपे वकील अडथळा आणणार आहेत. त्यामुळे या मालिकेचा प्रत्येक भाग प्रेक्षकांची उत्कंठा वाढवत आहे. विशेष म्हणजे यश आता जाहीरपणे त्याच्या प्रेमाची कबुली देणार आहे.
सध्या सोशल मीडियावर यश आणि नेहाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये यश नेहासमोर त्याच्या प्रेमाची कबुली देण्यासाठी प्रयत्न करत आहे. यात रस्त्याच्या एका बाजूला यश तर दुसऱ्या बाजूला नेहा उभी असते. यावेळी नेहापर्यंत पोहोचण्यासाठी तो पुरेपूर प्रयत्न करतो. परंतु, ट्रॅफीक असल्यामुळे त्याला ते शक्य होत नाही. त्यामुळे अखेर न राहावून तो भर रस्त्यात मोठ्याने ओरडून त्याच्या प्रेमाची कबुली देतो. परंतु, यशचं सत्य नेहाला आधीच समजलं असतं. त्यामुळे ती प्रचंड दु:खी झालेली असते. म्हणून यशने प्रेम व्यक्त केल्यावर ती त्यावर काहीच प्रतिक्रिया देत नाही.
दरम्यान, परांजपे वकील नेहाला यशचं सत्य सांगतात. यशचं ५०० कोटींच्या कंपनीचा मालक असल्याचं ते सांगतात. त्यामुळे नेहाला धक्का बसला असतो. इतकंच नाही तर ऑफिसमध्ये गेल्यानंतर आणि रस्त्यावर एका होर्डिंगवर यशचा फोटो झळकल्याचं ती पाहते. त्यामुळे नेहा पार कोलमडून जाते. इतके दिवस यश मैत्रीच्या नावाखाली आपली फसवणूक करत होता का? असा प्रश्न तिच्या मनात निर्माण होतो. त्यामुळे आता या मालिकेत पुढे काय होतं हे पाहणं औत्सुक्याचं आहे.