अखेर नेहा पडली यशच्या प्रेमात; राजीनामा घेणार मागे?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 05:10 PM2022-02-10T17:10:41+5:302022-02-10T17:10:59+5:30
Mazi tuzi reshimgath: काही दिवसांपूर्वीच नेहाने तिच्या नोकरीचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा यशने स्वीकारलादेखील होता.
छोट्या पडद्यावरील माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका सध्या अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. यश आणि नेहा यांच्या नात्यात अनेक ट्विस्ट येत असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे नेहाचा राग शांत होत नसल्यामुळे यशने तिच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर, यश आपल्यापासून दूर होतोय हे लक्षात येताच नेहाला तिच्या प्रेमाची जाणीव होते. त्यामुळे आता नेहा अप्रत्यक्षपणे यशसमोर तिच्या प्रेमाची कबुली द्यायचा प्रयत्न करत आहे.
अलिकडेच झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये नेहा यशपासून दूर जाण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचं दिसून येत आहे. तर, यशलादेखील तिच्या मनाची अवस्था समजली असून तो मुद्दाम तिच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहे.
काही दिवसांपूर्वीच नेहाने तिच्या नोकरीचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा यशने स्वीकारलादेखील होता. परंतु, २ महिन्याच्या कालावधीत आपण नेहाचं मन वळवू असं त्याला वाटलं होतं. त्यादृष्टीने तो प्रयत्नदेखील करत होता. मात्र, नेहा त्याचं काही एक ऐकायला तयार नव्हती. अखेर यश त्याचे प्रयत्न थांबवतो आणि तिची माफी मागतो. तसंच तू कधीही जॉब सोडून जाऊ शकतेस असं सांगतो.
दरम्यान, यशने माफी मागितल्यानंतर त्याने नेहाशी असलेला संवाद कमी केला. परंतु, यशच्या वागण्यात बदल झाल्यानंतर नेहाला तिच्या प्रेमाची जाणीव झाली. त्यामुळेच यशने तिला नोकरी सोडू नये हे सांगावं असं तिला वारंवार वाटत आहे. म्हणूनच, ती त्यादृष्टीने त्याला अप्रत्यक्षपणे सांगायचा प्रयत्न करत आहे.