रंग माझा वेगळा: दिपाला होणार जीवे मारण्याचा प्रयत्न; संशयाची सुई कार्तिककडे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 06:24 PM2023-04-06T18:24:24+5:302023-04-06T18:25:13+5:30
Rang Maza Vegla: दिपा मध्यरात्री धावत धावत तिच्या रुममधून खाली धावत येते. आणि, चेहरा झाकलेला एक व्यक्ती आपल्या रुममध्ये येऊन मला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं सौंदर्याला सांगते.
छोट्या पडद्यावर गाजलेली मालिका म्हणजे 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla). काही दिवसांपूर्वीच दिपाच्या आयुष्यात पुन्हा एकदा कार्तिकच एन्ट्री झाली आहे. मात्र, एकेकाळी दिपावर प्रेम करणारा कार्तिक आता तिचा तिरस्कार करु लागला आहे. दिपामुळेच आपल्याला तुरुंगात जावं लागलं असा समज करुन कार्तिक तिला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्येच आता दिपाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. त्यानुसार, दिपाला कोणीतरी जीवे मारायचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. इतकंच नाही तर दिपाला मारण्याचा हा डाव कार्तिकनेच रचला असून यात त्याला श्वेता मदत करत असल्याचं दिसून येत आहे.
व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये दिपा मध्यरात्री धावत धावत तिच्या रुममधून खाली धावत येते. आणि, चेहरा झाकलेला एक व्यक्ती आपल्या रुममध्ये येऊन मला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं सौंदर्याला सांगते. त्यावर घरातले सगळे जण दिपाच्या रुमची तपासणी करतात. मात्र, त्यांना कोणीही दिसत नाही. त्यानंतर श्वेता एक जळालेली बॅग सगळ्यांना दाखवते आणि कार्तिकने दिलेलं गिफ्ट दिपाने जाळलं असून तिला कोणी तरी मारण्याचा प्रयत्न करतंय असा खोटा बनाव करत असल्याचं म्हटलं.
दरम्यान, आता दिपाच्या बोलण्यावर सौंदर्या विश्वास ठेवेल का? की श्वेताचं म्हणणं तिला पटेल हे येत्या भागात कळणार आहे. मात्र, कार्तिक घरी परतल्यापासून तो सतत या ना त्या कारणावरुन दिपाला त्रास देत आहे. त्यामुळे यावेळीही संशयाची सुई त्याच्याकडेच जाते. मात्र, यावेळी खरोखरच कार्तिकने दिपाला मारायला प्रयत्न केलाय का हे पाहणं औत्सुक्याचं ठऱणार आहे.