'ये रिश्ते है प्यार के' मालिका येणार एक नव्या वळणावर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 06:30 AM2019-04-27T06:30:00+5:302019-04-27T06:30:00+5:30
‘ये रिश्ते है प्यार के’ पहिल्याच दिवसांपासून रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. या मालिकेनं अल्पावधीतच रसिकांच्या मनात आपलं वेगळे स्थान निर्माण केले आहे
‘ये रिश्ते है प्यार के’ पहिल्याच दिवसांपासून रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. या मालिकेनं अल्पावधीतच रसिकांच्या मनात आपलं वेगळे स्थान निर्माण केले आहे. मालिकेचे कथानक आपला ‘जो़डीदार निवडणे हा विचारपूर्वक घ्यावयाचा निर्णय असून त्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे,’ या संकल्पनेभोवती गुंफण्यात आले आहे. आता ही संकल्पना आणखी एक पाऊल पुढे नेताना मालिकेच्या निर्मात्यांनी विवाहपूर्व संबंधांच्या विषयाला स्पर्श केला आहे.
‘ये रिश्ते है प्यार के’ या मालिकेचे निर्माते राजन शाही यांनी या विषयासंदर्भात आपले विचार व्यक्त करून लग्न आणि नातेसंबंध याबाबत आजच्या पिढीचे काय विचार आहेत, त्यावर चर्चा केली आहे. मालिकेच्या संकल्पनेशी प्रामाणिक राहताना मालिकेतील नायक आणि नायिका एकमेकांशी विवाहबंधनात अडकण्यापूर्वी एकमेकांना जाणून घेण्यासाठी काही काळ एकत्र व्यतीत करण्याचा निर्णय घेतात, असे शाही म्हणाले. मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना दिसेल की मिष्टी (र््हिया शर्मा) ही कुणालशी (ऋत्विक अरोरा) लग्न करण्यापूर्वी त्याच्याबरोबर काही काळ व्यतीत करण्याचा निर्णय आपल्या कुटुंबियांकडे व्यक्त करते आणि त्यावर तिच्या कुटुंबियांची काय प्रतिक्रिया होते. “टीव्ही मालिकांमध्ये आजवर अनेक विषय सादर झाले असले, तरी लग्नापूर्वीच्या काळात एकत्र राहण्याच्या विषयाला आजवर कोणी स्पर्श केलेला नाही.
आम्हाला हे दाखवून द्यायचं आहे की लग्न हा मुलीसाठी एकतर्फी विषय नसतो आणि लग्नापूर्वी एकमेकांना जाणून घेताना पसंत न पडल्यास कोणीही लग्नाला नकार देऊ शकतं. मिष्टी आणि कुणाल यांच्या लग्नाचं प्रकरण कसं पुढे सरकेल, त्यावर दोन्ही कुटुंबांतील ज्येष्ठ व्यक्तींची मतं काय असतील आणि या दरम्यान काही अनपेक्षित गौप्यस्फोट कसे होतील, तेही प्रेक्षकांना पाहायला मिळेल,” असे शाही म्हणाले.