"व्हाईट हाऊसमध्ये भारतीय जेवण बनवायला आवडेल", डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होताच मास्टरशेफकडून अभिनंदन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 03:34 PM2024-11-06T15:34:50+5:302024-11-06T15:35:31+5:30
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होताच मास्टरशेफ इंडिया फेम शेफ विकास खन्नाने पोस्ट शेअर केली आहे.
अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल हाती आले आहेत. रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पुढील अध्यक्ष असतील हे स्पष्ट झाले आहे. अटीतटीची लढत असल्याचे सांगण्यात येत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आज मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच जोरदार मुसंडी मारत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यावर विजयी आघाडी घेतली. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होताच मास्टरशेफ इंडिया फेम शेफ विकास खन्नाने पोस्ट शेअर केली आहे.
विकास खन्नाने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे. एका इव्हेंटमधील हा फोटो आहे. या फोटोमध्ये विकास खन्ना आणि डोनाल्ड ट्रम्प हँडशेक करताना दिसत आहेत. त्यांच्या पाठीमागे ए.आर.रहमानही उभं असल्याचं दिसत आहे. या फोटोला विकास खन्नाने दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. "हॅलो मिस्टर प्रेसिडेंट! जेव्हा आपण मागे भेटलो होतो तेव्हा तुम्ही वचन दिल्याप्रमाणे व्हाईट हाऊसवर भारतीय जेवण बनवायला आवडेल", असं कॅप्शन विकास खन्नाने या पोस्टला दिलं आहे.
दरम्यान, २०२० मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत तत्कालीन राष्ट्राध्यक्ष असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना डेमोक्रॅटिक पक्षाच्या ज्यो बायडन यांच्याकडून पराभूत व्हावं लागलं होतं. मात्र पराभवाचा धक्का बसल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२४ च्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती. तसेच त्यांनी आक्रमक प्रचार करत रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारीही मिळवली होती. त्यांच्यासमोर डेमोक्रॅटिक पक्षाकडून कमला हॅरिस यांनी आव्हान उभं केलं होतं. मात्र अटीतटीची मानली जाणारी ही अध्यक्षीय निवडणूक डोनाल्ड ट्रम्प यांनी जिंकली. आता अमेरिकेचे ४७ वे राष्ट्रपती म्हणून ते जानेवारी महिन्यात शपथ घेतील.