माझी तुझी रेशीमगाठ: 'मनात धाकधूक होती..'; नेहाच्या नवऱ्याने दिली पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 04:27 PM2022-06-22T16:27:12+5:302022-06-22T16:27:41+5:30
Nikhil rajeshirke:'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत अभिनेता निखिल राजेशिर्के नेहाच्या पहिल्या नवऱ्याची भूमिका साकारत आहे.
'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका सध्या एका रंजक वळणावर आली आहे. मालिकेत नुकताच यश आणि नेहाचा दिमाखदार विवाह सोहळा पार पडला.त्यामुळे या दोघांच्या सुखी संसाराला सुरुवात झाली आहे. मात्र, या संसाराला गालबोट लावण्यासाठी नेहाच्या पहिल्या नवऱ्याने मालिकेत एन्ट्री घेतली आहे. नुकतीच या मालिकेत अविनाशची एन्ट्री झाली असून मालिकेत एक नवा ट्विस्ट आला आहे. याविषयी अविनाशची भूमिका साकारणाऱ्या निखिल राजेशिर्केने त्याचा अनुभव शेअर केला आहे.
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत अभिनेता निखिल राजेशिर्के नेहाच्या पहिल्या नवऱ्याची भूमिका साकारत आहे. नेहाचं लग्न झाल्यानंतर अविनाशची या मालिकेत एन्ट्री झाली असून त्याने आता परीशी मैत्री करण्यास सुरुवात केली आहे.
"परीचा बाबा कोण असेल? याबाबत सिरीअल सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांना उत्सुकता होती, तशीच ती मलाही होती आणि ही भूमिका करण्याची संधी मला मिळावी अशी मनोमन इच्छाही होती आणि म्हणतात ना , "अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश मे लग जाती हैं" या उक्तीप्रमाणे ही भूमिका माझ्या वाट्याला आली म्हणून आनंद आणि जबाबदारी वाढली आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका रंजक वळणावर आली आहे. मालिकेत परीच्या बाबाची एन्ट्री झाली आहे, नेहासाठी आणि प्रेक्षकांसाठीही हे धक्कादायक वळण आहे. कारण नेहा आणि यशचं नुकतंच लग्न झालं आहे आणि आत्ता कुठे या दोघांचा संसार सुरू झालेला असतानाच हे अविनाश नावाचं वादळ त्यांच्या संसारात डोकावू पहातंय. या अशा रंजक वळणावर एन्ट्री करताना रंगभूमीवर प्रयोग सुरू व्हायच्या आधी कलाकारांच्या मनात जी धाकधूक होती तशीच धाकधूक अविनाश साकारतानाही होत आहे, परंतु सहकलाकार व तंत्रज्ञांच्या सहकार्यामुळे दडपण असं नाही", असं निखिल म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "मला अभिनय करायला आवडतं आणि वेगवेगळ्या भूमिका करण्याचं भाग्य मला लाभलं. अविनाशची भूमिका साकारताना खास तयारी म्हणाल तर त्याची व्यक्तीरेखा ही मुख्यत्वे परीला आवडेल अशी हवी आणि इतरांना त्याची चीड आणि त्रास होईल अशी साकारावी लागेल अशा अनेक मुद्द्यांवर मार्गदर्शन मालिकेचे दिग्दर्शक अजय मयेकर यांच्याकडून नेहमीच होत आहे. बाकी अविनाशच्या दिसण्याबाबत वेगळेपण व विशेष लकबी असण्यासाठी इतर भूमिकांप्रमाणे मी विचार करून काम करतोय."