माझी तुझी रेशीमगाठ: संकर्षणऐवजी 'या' अभिनेत्याला होती पहिली पसंती; थोडक्यात गमावली गाजलेली मालिका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 10:09 AM2023-07-14T10:09:50+5:302023-07-14T10:10:28+5:30
Mazi tuzi reshimgath: 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील समीर या भूमिकेसाठी एका लोकप्रिय मराठी अभिनेत्याची निवड करण्यात आली होती.
छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ' (mazi tuzi reshimgath ). उत्तम कथानक आणि कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय यामुळे ही मालिका तुफान गाजली. विशेष म्हणजे मालिकेतील नेहा आणि यश यांच्याव्यतिरिक्त अन्यही काही भूमिका गाजल्या. त्यातलीच एक भूमिका म्हणजे समीर. अभिनेता संकर्षण कऱ्हाडे या साकारलेली ही भूमिकादेखील लोकप्रिय ठरली होती. परंतु, या भूमिकेसाठी संकर्षण पहिली पसंती नसल्याचं नुकतंच समोर आलं.
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील समीर या भूमिकेसाठी एका लोकप्रिय मराठी अभिनेत्याची निवड करण्यात आली होती. मात्र, त्याने या मालिकेसाठी नकार दिला. विशेष म्हणजे या मालिकेला नकार दिल्यानंतर त्याची 'मन उडू उडू झालं' ही मालिका छोट्या पडद्यावरदेखील तितकीच लोकप्रिय ठरली. अलिकडेच या अभिनेत्याने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्याने माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेविषयी भाष्य केलं.
''माझी ही नवी मालिका अजय पुरकर दिग्दर्शित करत असून त्यांनी यापूर्वी 'माझी तुझी रेशीमगाठ' ही दिग्दर्शित केली आहे. खूप कमी लोकांना ही गोष्ट ठावूक आहे की या मालिकेतील समीरच्या भूमिकेसाठी मला विचारणा करण्यात आली होती. परंतु, काही वैयक्तिक कारणामुळे मी ती भूमिका करु शकलो नाही. नंतर ती भूमिका संकर्षण कऱ्हाडेने साकारली. यावेळी मी अशा एका मालिकेच्या शोधात होतो ज्यात मला मुख्य भूमिका करायला मिळेल", असं अजिंक्य म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "माझी ही इच्छा पूर्ण झाली. त्यांनीच मला त्यांच्या आणखी एका मालिकेत मुख्य भूमिका ऑफर केली. ती मालिका म्हणजे मन उडू उडू झालं. यात मी मुख्य भूमिका केली होती. त्यावेळी मी वाट पाहिली आणि त्याचं फळ मला मिळालं. तेव्हा मी सहकलाकाराची भूमिका नाकारली आणि मला नायकाची भूमिका मिळाली. यावरुन एकच कळतं की प्रत्येक गोष्ट तुमच्याकडे योग्य वेळ आल्यावरच येते." दरम्यान, अजिंक्य लवकरच अबोल प्रीतीची अजब कहाणी या मालिकेत झळकणार आहे. सध्या या मालिकेचे अनेक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या मालिकेत तो एका बिझनेसमनची भूमिका साकारत आहे.