#MeToo : पुन्हा एकदा अनु मलिकची होणार ‘इंडियन आयडल’ मधून हकालपट्टी?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 12:36 PM2019-11-06T12:36:52+5:302019-11-06T12:38:19+5:30
मीटूचे वादळ शांत झाले आणि अनु मलिक ‘इंडियन आयडल 11’मध्ये परतला. पण आता हे वादळ पुन्हा घोंघावू लागले आहे. याचाच परिणाम म्हणजे, पुन्हा एकदा अनु मलिकची ‘इंडियन आयडल 11’मधून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे.
मीटूच्या वावटळीत बॉलिवूडचे अनेक दिग्गज अडकले होते. या चळवळीअंतर्गत अनेक महिलांनी बॉलिवूडच्या अनेकांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. बॉलिवूडचा आघाडीचा संगीतकार अनु मलिक याच्यावरही लैंगिक शोषणाचा आरोप झाला होता. यानंतर अनु मलिकची एका रात्रीत ‘इंडियन आयडल 10’ या शोमधून हकालपट्टी झाली होती. वर्षभरानंतर मीटूचे वादळ शांत झाले आणि अनु मलिक ‘इंडियन आयडल 11’मध्ये परतला. पण आता हे वादळ पुन्हा घोंघावू लागले आहे. याचाच परिणाम म्हणजे, पुन्हा एकदा अनु मलिकची ‘इंडियन आयडल 11’मधून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. सोनी वाहिनेने याबद्दलचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
(अनु मलिक-सोना मोहपात्रा)
अनु मलिक ‘इंडियन आयडल 11’मध्ये परतताच गायिका सोना मोहपात्रा हिने संताप व्यक्त केला होता. ‘महालांच्या सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण होण्यासाठी काय ‘निर्भया’ सारखीच घटना घडायला पाहिजे का? असे ट्विट तिने केले होते. तिच्या या ट्विटला उत्तर देताना आता गायिका नेहा भसीन हिने तिच्यावर बेतलेला प्रसंग सांगितला होता. ‘ मी 21 वर्षांची असताना एका गाण्याची सीडी देण्यासाठी अनु मलिकला भेटली होती. त्यावेळी मी इंडस्ट्रीत नवीन होते तर अनु प्रसिद्धीच्या शिखरावर होता. त्याला भेटायला गेले असता तो सोफ्यावर झोपलेला होता आणि माझ्या डोळ्यांविषयी चर्चा करत होता. त्याचे वागणे अत्यंत आक्षेपार्ह होते. मला ते मुळीच आवडले नाही. अखेर खोटे कारण सांगून मी तिथून पळून गेले. माझी आई खाली वाट बघतेय असे सांगून मी अक्षरश: तिथून पळ काढला होता. त्यानंतरही त्याने मला मॅसेज व फोन केलेत. मी त्यावर प्रतिक्रिया देणे बंद केले,’ असे नेहा भसीनने म्हटले होते.
(अनु मलिक- नेहा भसीन)
इतकेच नाही तर अनु मलिक एक विकृत मानसिकतेचा पुरूष आहे, असेही नेहाने म्हटले होते. तिच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर अनु मलिकविरोधात संताप व्यक्त करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर सोनी वाहिनीने पुन्हा एकदा अनु मलिकला शोमधून हटविण्याचा विचार चालवला आहे.
यापूर्वी चार महिलांनी केलेत आरोप अनु मलिक यांच्यावर आत्तापर्यंत चार महिलांनी लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. सर्वप्रथम गायिका श्वेता पंडित हिने अनु मलिक यांच्यावर गंभीर आरोप केलेत. यानंतर गायिका सोना मोहपात्रा हिनेही अनु मलिक यांच्यावर गैरवर्तनाचा ठपका ठेवला. पाठोपाठ अन्य दोन महिलांनीही अनु मलिकविरोधात आवाज उठवला. मात्र दोघींनीही नावे जाहीर केलेली नाहीत. ‘अनू मलिक यांच्या घरी गेले असता, सोफ्यावर ते माज्या बाजूला येऊन बसले आणि त्यांनी माझा स्कर्ट वर करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना ढकलून पळण्याचा प्रयत्न केला, पण मला ते शक्य झाले नाही. नशिबाने तेव्हा कोणीतरी दार वाजवले, पण या प्रसंगाबाबत कोणाला काही न सांगण्याची धमकी त्यांनी मला दिली, असा एका महिलेचा आरोप आहे.अनु मलिक यांच्यावर दुसरा आरोप करणारी महिला इंडियन आयडलच्या काही वर्षांपूर्वीच्या भागाची स्पर्धक राहिली आहे.