'चार दिवस सासूचे' मालिकेत नम्रता संभेरावने केलेलं काम, अभिनेत्री खुलासा करत म्हणाली, "एकांकिकेत काम केल्यानंतर..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 12:49 PM2023-11-15T12:49:40+5:302023-11-15T12:50:28+5:30
'चार दिवस सासूचे' आणि 'वादळवाट' या मालिकांमध्ये काम केल्याचा खुलासा नम्रताने मुलाखतीत केला. त्याचबरोबरच हिंदी मालिकेतही ती झळकली होती.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव. अभिनय आणि विनोदाची उत्तम सांगड घालत नम्रता प्रेक्षकांना खळखळवून हसवते. प्रत्येक स्किटमध्ये नम्रताच्या अभिनयाचा मॅडनेस दिसतो. टॅलेंट आणि अपार मेहनतीच्या जोरावर नम्रताने मराठी कलाविश्वात स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. पण, विनोदाचं अचूक टायमिंग साधत रसिकांचं मनोरंजन करणाऱ्या नम्रतासाठी अभिनय क्षेत्रातील हा प्रवास सोपा नव्हता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नम्रताने कलाविश्वातील स्ट्रगलबद्दल भाष्य केलं.
नम्रताने सिनेपत्रकार सौमित्र पोटे यांच्या मित्र म्हणे पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या करिअरबद्दल भाष्य केलं. शालेय जीवनापासूनच नम्रताला अभिनयाची आवड होती. नंतर कॉलेजमध्ये तिच्या अभिनयातील प्रवासाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात अनेक छोट्या भूमिका नम्रताच्या वाट्याला आल्या. 'चार दिवस सासूचे' आणि 'वादळवाट' या मालिकांमध्ये काम केल्याचा खुलासा नम्रताने या मुलाखतीत केला. त्याचबरोबरच हिंदी मालिकेतही ती झळकली होती.
"एकांकिकेत काम केल्यानंतर मी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करायला लागले. 'कभी कभी' नावाच्या हिंदी मालिकेतही मी काम केलं आहे. त्या मालिकेत आएशा जुल्का होती. एक प्रेत ठेवलेलं आणि त्याच्या अवतीभोवती माणसं होती. तर रडण्यासाठी गावकरी बोलवतात, त्यातली मी एक होते. कुठे, कसं जायचं याची मला फारशी माहिती नसल्यामुळे सुरुवातीच्या काळात माझी आई माझ्याबरोबर असायची. तेव्हा १००-१५० रुपये मिळायचे. पण, पैसे कमावणे हा माझा हेतू नव्हता. मी सेटवर थांबायचे आणि बघायचे. कारण, मला काम करायचं होतं. मला अभिनय शिकायचा आहे, हा माझा हेतू होता. कारण, मध्यमवर्गीय कुटुंबातून असल्यामुळे अभिनय शिबिरासाठी वगैरे पैसे नसायचे. मग आपणच काम करायचं आणि त्यातून मिळालेल्या पैशांमधून हे सगळं करायचं," असं नम्रता म्हणाली.
पुढे ती म्हणाली, "त्यानंतर मग ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून 'चार दिवस सासूचे' , 'वादळवाट' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं. वादळवाटमध्ये मी रिपोर्टची भूमिका साकारली होती. नुसता माईक धरायचा आणि काहीतरी लिहून काढायचं, एवढाच अभिनय असायचा. पण, हे करतानादेखील मला मज्जा यायची. मग हळूहळू एखादं वाक्य बोलायला मिळू लागलं. त्यानंतर मग छोट्या भूमिकाही मला मिळाल्या. मी अवघाचि संसारमध्ये दोन दिवसाचं एक पात्र साकारलं होतं."