'सख्खा भाऊ पक्का वैरी इतका चालला की त्यानंतर..'; मिलिंद गवळींनी व्हिडीओ शेअर करत जागवली आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 02:48 PM2024-08-08T14:48:24+5:302024-08-08T14:48:56+5:30
मिलिंद गवळींनी एक सुंदर व्हिडीओ शेअर केलाय. यात त्यांनी ग्रामीण भागातील प्रेक्षक किती निःस्वार्थी प्रेम करतात हे दाखवलं आहे (milind gawali)
आई कुठे काय करते फेम अभिनेते मिलिंद गवळी आज महाराष्ट्रात मालिकेतील अनिरुद्ध या व्यक्तिरेखेमुळे लोकप्रिय झाले आहेत. मिलिंद गवळींना आज आपण मालिकांमध्ये अभिनय करताना पाहत असलो तरी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात एक काळ गाजवला आहे. मिलिंद यांचे सिनेमे ग्रामीण भागांमध्ये जत्रेत दाखवले जायचे. त्यावेळी त्यांना भेटायला आणि त्यांची सही घ्यायला गावकरी अक्षरशः रांगा लावायचे. इतकं जबरदस्त फॅन फॉलोईंग त्यांनी बघितलंय. मिलिंद यांनी असाच एक व्हिडीओ शेअर करुन जुना काळ जागवला आहे.
मिलिंद यांनी व्हिडीओ शेअर करुन लिहिलंय की, "अण्णा देशपांडे हे साताऱ्यामध्ये राहणारे, मुंबईला मला भेटायला आले, मला म्हणाले की "मी काही तुमचे सिनेमे कधी पाहिले नाही, पण अनुप जगदाळे जे यात्रेमध्ये टुरिंग टॉकीज चालवतात त्यांनी मला सांगितलं की या मुलाला तुम्ही सिनेमांमध्ये घ्या", त्यांनी तुमचे 'सून लाडकी सासरची' आणि 'मराठा बटालियन' हे दोन सिनेमे तुफान चालवले होते, अण्णा मला म्हणाले की खरंतर या सिनेमांमध्ये मी या भूमिकेसाठी सयाजी शिंदे यांनाच घेणार होतो, पण ते दक्षिण सिनेमांमध्ये बिझी झाल्यामुळे मला दुसरा कलाकार घ्यायचा आहे, मला असं वाटतं तुम्ही हा चित्रपट करावा कारण हा चित्रपट खूप चालणार आहे, म्हटलं तुम्ही इतकं खात्रीपूर्वक कसं काय सांगू शकता, तर ते म्हणाले हा विषयच असा आहे, 'सख्खा भाऊ पक्का वैरी' हि महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातली व्यथा आहे, महाराष्ट्रात भावा-भावांच्या भांडणांमध्ये जमिनीचे छोटे छोटे तुकडे झाले आहेत, महाराष्ट्रामध्ये खूप कमी अशी घरं आहेत जिथे भाऊ भाऊ गुण्यागोविंदाने नांदत असतात. त्यामुळे हा चित्रपट चालेलच, कारण हा प्रत्येक घराची व्यथा सांगतो."
मिलिंद गवळी पुढे लिहितात, "सख्खा भाऊ पक्का वैरी" इतका चालला की त्यानंतर या सिनेमामुळे मला जवळजवळ 40 एक सिनेमे तरी मिळाले असतील,
जी जी राज वासवानी नावाचे सिनेमा वितरक होते, त्यांनी मला हा ग्रामीण भाग दाखवला, माझ्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी , मी त्यांच्या बरोबर महाराष्ट्राची यात्रानीयात्रा पिंजून काढली, ग्रामीण भागातल्या प्रेक्षकांनी माझ्या कडून लाखो सह्या घेतल्या असतील, आपल्याला लोकांनी स्वीकारलं आहे याची मला जाणीव झाली, एका कलाकारावर जितकं प्रेम ग्रामीण प्रेक्षक करू शकता तितकं प्रेम शहरी प्रेक्षक करू शकत नाही असं मला वाटतं , कारण शहरी प्रेक्षकांना हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांनी त्यांच्या कलाकारांनी भुरळ घातलेली आहे."
मिलिंद गवळी शेवटी लिहितात, "त्या काळामध्ये ग्रामीण महिलांना यात्रेला सिनेमा हेच एक करमणुकीचं साधन होतं, बैलगाडीतून यायचं देवदर्शन करायचं आणि एखादा छान अध्यात्मिक सिनेमा बघायचा, लहान मुलांना गोड गोड रेवड्या, मग लक्ष्मण झुल्या मध्ये बसवायचं, आणि मग परत आपल्या गावाकडे निघून जायचं, बघितलेला सिनेमा जर "माहेरच्या साडी" सारखा असेल तर मग त्या सिनेमातल्या अलकाताईंना आयुष्यभर मनामध्ये जागा द्यायची, मी स्वतःला खरंच भाग्यवान समजतो की मला या सिनेमांमध्ये कामं करायला मिळाली, आज "आई कुठे काय करते" ही मालिका करत असताना ते सगळे प्रेक्षक ज्यांनी माझे ते ग्रामीण सिनेमा बघितलेले होते त्या प्रेक्षकांचं वेगळेच प्रेम माझ्यावर आहे असं मला सतत जाणवत असतं."