"पाश्चात्य देश बघायच्या आधी आपली मुंबई, भारत बघा" अभिनेत्यानं शेअर केला सुंदर अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 15:58 IST2025-02-03T15:58:10+5:302025-02-03T15:58:21+5:30
पाश्चात्य देश बघायच्या आधी आपली मुंबई आपला भारत आधी बघा, जगातले अनेक देश आपल्या देशासमोर फिके पडतात, असं अभिनेत्यानं म्हटलं.

"पाश्चात्य देश बघायच्या आधी आपली मुंबई, भारत बघा" अभिनेत्यानं शेअर केला सुंदर अनुभव
मिलिंद गवळी (Milind Gawali) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्यांनी आतापर्यंत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. कधी नायक तर कधी खलनायकाच्या भूमिकेत ते दिसून आले. प्रत्येक भूमिकेतून त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली. त्यांच्या अभिनयामुळे त्यांचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.ते सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. अशातच त्यांनी काळा घोडा फेस्टिव्हलला भेट दिली.
काळा घोडा फेस्टिव्हलमधील सुंदर अनुभव मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय. पोस्ट करत त्यांनी लिहलं, "यावेळेला काला घोडा फेस्टिवलला जाण्याचा योग आला, दरवर्षी काला घोडा फेस्टिवल येतो आणि दरवर्षी फेस्टिवलला जाण्याचं राहूनच जायचं, आणि फेस्टिवल संपल्यानंतर मनात एक खंत असायची, की आपण हे फेस्टिवल मिस केलं. यावर्षी मला ते मिस करायचं नव्हतं, काला घोडा सारखं फेस्टिवल मुंबईत कुठेही भरत नाही. ही एक प्रकारची क्रिएटिव्ह जत्राच असते, भारतातले असंख्य क्रिएटिव्ह माणसं या फेस्टिवलमध्ये सहभाग घेतात".
"1999 मध्ये हा कलाघोडा फेस्टिवल सुरू झालं,दरवर्षी आठ ते दहा लाख लोक या फेस्टिवलला येत असतात. माझे अनेक मित्र दरवर्षी या फेस्टिला हजेरी लावतात. अनेक वर्ष माझं मात्र राहून जायचं, यावेळेला मी आणि दिपा, आम्ही दोघांनी ठरवलं यावर्षी काही झालं तरी फेस्टिवलला जायचं, आणि काल काला घोडा फेस्टिवलला जाऊन आलो, काला घोडाच्या बाजूला जहांगीर आर्ट गॅलरी आहे. दरवर्षी या फेस्टिवलच्या दरम्यान तिथे अतिशय सुंदर पेंटिंग आणि स्कल्पचरचं एक्जीबिशन असतं, काल तेही पाहायला मिळालं. त्याच्याच थोडं पुढे गेलं की छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय आहे. पूर्वी त्याला प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम असं म्हणायचे, काला घोडा फेस्टिवलचा काही भाग तिथेही भरवला जातो".
"दिपा म्हणाली तिने ते कधी हे म्युझियम पाहिलं नाहीये. मग ते वस्तुसंग्रहालय बघायला पण गेलो, रेडिओला नोकरी करत होतो, त्या वेळेला याच भागामध्ये माझं काम असायचं. मग वेळ मिळाला की या म्युझियममध्ये यायचो आणि अनेक तास इथे रमायचो. अनेक वर्षांनी काल मी हे वस्तुसंग्रहालय बघितलं. खूप छान वाटलं. अतिशय सुंदर पद्धतीने हे वस्तुसंग्रहालय मेंटेन केलेलं आहे. लहान मुलांना आणि तरुण मुलांना देखील इथे आवर्जून आण्याची गरजेचं आहे. जर तुम्ही हे आतापर्यंत बघितलं नसेल, तर प्लीज हे म्युझियम बघायला जा आणि भरपूर वेळ काढून जा. भारतीय संस्कृती भारतीय परंपरा, सगळ्याच खूप सुंदर दर्शन घडतं".
"यावर्षीच्या कालाघोडा चे आता काही दिवसच राहिले असतील, वेळ काढून जा. सर्जनशील, निर्मितीक्षम, क्रिएटिव्ह लोकांचा मेळावा, खरंच बघण्यासारखं असतं, आर्टिस्ट पेंटर्स, म्युझिशियनज, जा बघा तर एकदा जाऊन. या गजबजलेल्या सिमेंट काँक्रीटच्या जंगलातनं, वेगळी मुंबई तुम्हाला दिसेल, मुंबई फार सुंदर आहे आणि या मुंबईची सुंदर बाजू बऱ्याचश्या मुंबईकरांनीच पाहिलेली नाहीये. मी नशीबवान आहे लहानपणापासून मी ही वेगळी मुंबई अनेक वेळेला अनुभवली आहे. आता वेळ मिळेल तसा पुन्हा एकदा ती अनुभवणार आहे. पाश्चात्य देश बघायच्या आधी आपली मुंबई आपला भारत आधी बघा, जगातले अनेक देश आपल्या देशासमोर फिके पडतात", असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं.