'बेपत्ता' कॉमेडियन सुनील पाल अखेर सापडला; दोन दिवसांपासून होता गायब, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 11:47 PM2024-12-03T23:47:08+5:302024-12-03T23:47:51+5:30
Sunil Pal missing: १ डिसेंबरला शो साठी मुंबईबाहेर गेलेला सुनील पाल होता 'नॉट रिचेबल'; पत्नीने घेतली होती मुंबई पोलिसांत धाव
Sunil Pal missing: २ दिवसांपासून बेपत्ता असल्याचा संशय असलेला लोकप्रिय कॉमेडियन सुनील पाल अखेर सापडला. तो एका शो साठी मुंबईबाहेर गेला होता, त्यानंतर तो बेपत्ता झाला. कॉमेडियन घरी न परतल्याने आणि त्याचा फोनही लागत नसल्याने सुनीलची पत्नी सरिता पाल यांनी मंगळवारी मुंबई पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. अभिनेत्याच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार, तो मंगळवारी घरी परतणार होता, मात्र तो परतला नाही. त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, आधी त्याने फोन उचलला नाही आणि नंतर फोन बंद झाला. मुंबई पोलिसांनी मात्र अवघ्या काही तासांतच सुनील पॉलचा ठावठिकाणा शोधून काढला. उद्या सुनील पाल दिल्लीहून मुंबईला परतणार आहे. त्यानंतर त्याची पत्नी पत्रकार परिषद घेऊन सर्व गोष्टींचा उलगडा करेल, अशी माहिती देण्यात येत आहे.
'बेपत्ता' सुनील पाल सापडला
सुनील पाल बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने सांताक्रुझ पोलिस स्थानकांत केली होती, पण तक्रार दाखल केल्यानंतर काही तासांनी सुनील सापडला. सरिताने दैनिक भास्करसोबत शेअर केलेल्या अपडेटमध्ये सांगितले की, सुनील बरा आहे आणि तो दिल्लीहून मुंबईला येत आहे. मी आत्ताच साऱ्या प्रकाराबाबत फार काही सांगू शकणार नाही. सध्या मी पोलीस ठाण्यात आहे. सुनील एका पोलिस अधिकाऱ्याशी बोलला आणि तो परत मुंबईला येत असल्याचा निरोप दिला. सुनील घरी परतल्यानंतर मी त्याच्याशी बोलेन आणि मला जे काही कळेल ते उद्याच्या पत्रकार परिषदेत सगळ्यांना सांगेन, असे त्याची पत्नी सरिता म्हणाली.
सुनील पालची कारकिर्द
सुनील पाल २००५ साली 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' जिंकला. शो जिंकल्यानंतर सुनील अनेक कॉमेडी रिॲलिटी शोमध्ये दिसला. त्याने स्टँड-अप कॉमेडीही केली आणि चित्रपटांमध्ये काम केले. त्याने 'हम तुम' (२००४) आणि 'फिर हेरा फेरी' (२००६) सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत.