'सारेगमप लिटिल चॅम्प्स'मधील मोदक-मॉनिटर लवकरच बांधणार लग्नगाठ, प्रथमेशचं पार पडलं पहिलं केळवण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 09:33 AM2023-06-28T09:33:49+5:302023-06-28T09:34:04+5:30
Prathamesh Laghate And Mugdha Vaishampayan : काही दिवसांपूर्वीच प्रथमेश आणि मुग्धा एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा सोशल मीडियावर केला आणि त्यानंतर त्या दोघांवर कौतुकाचा आणि अभिनंदाचा वर्षाव केला.
छोट्या पडद्यावरून सारेगमप लिटिल चॅम्प्स (Sa Re Ga Ma Pa Little Champs) कार्यक्रमातील पंचरत्नांपैकी मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) आणि प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) हे दोघंजण त्यांच्या गाण्यांमुळे तसेच त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामुळे खूपच चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रथमेश आणि मुग्धा एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा सोशल मीडियावर केला आणि त्यानंतर त्या दोघांवर कौतुकाचा आणि अभिनंदाचा वर्षाव केला. दरम्यान आता ते दोघे लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत आणि त्यांच्या केळवणाला सुरुवात झाली आहे. नुकताच प्रथमेशने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो त्याच्या पहिल्या केळवणाचा व्हिडीओ आहे.
गायक प्रथमेश लघाटेने इंस्टाग्रामवर पहिल्या केळवणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत प्रथमेशने छान उखाणा देखील घेतला. वाढलेलं पान रिकामं केलं एकेक घास घेत घेत, चतुरंगच्या कार्यालयामध्ये माझ्या केळवणाचा जमला फक्कड बेत, हा उखाणा त्याने घेतला. खरेतर त्याचे चतुरंग प्रतिष्ठानने केळवण केले आहे. त्याने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “आमचं ठरलंय”च्या घोषणेनंतर आता हळूहळू केळवाणांना सुरुवात होतीय! हे फीलिंग खूप भारी आहे! अतिशय पारंपरिक पद्धतीने, प्रचंड आपुलकीने, पंच पक्वांनाच्या जेवणाने, अतिशय आग्रहाने खाऊ घालून माझ्या केळवणांचा शुभारंभ “चतुरंग” ने केला त्याबद्दल चतुरंग च्या पूर्ण टीम ला खूप खूप धन्यवाद!
या पोस्टमधील कॅप्शनमध्ये प्रथमेशने मुग्धाला मिस करत असल्याचेही म्हटले. इतकेच नाही तर कमेंटमध्ये मुग्धाने किती छान अशी कमेंटदेखील केली आहे. प्रथमेशच्या पहिल्या केळवणाच्या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे. चाहते लग्न कधी करणार असे विचारत आहेत.
प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी आपापल्या सोशल मीडिया हँडलवरून तसेच पेजवरून रिलेशनशीपमध्ये असल्याचे जाहीर केले. “तुम्हा सर्वांना आमच्याकडून बातमी किंवा घोषणेची अपेक्षा आहे. तेच हेच आहे. शेवटी आमचं ठरलंय!”, असे कॅप्शन देत दोघांनी प्रेमात असल्याची कबुली दिली होती. आता त्या दोघांच्या लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.