सुशांत सिंह राजपूतप्रमाणे ‘महादेव’ फेम अभिनेता मोहित रैना आत्महत्या करू शकतो; अभिनेत्रीचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 08:08 AM2021-06-09T08:08:26+5:302021-06-09T08:12:26+5:30
मुंबई उच्च न्यायालयात याबाबत सुनावणी होणार आहे. हे प्रकरण कोर्टात असल्याने त्यावर जास्त भाष्य करू शकत नाही असं मोहितनं सांगितले आहे.
मुंबई – देवों के देव महादेव फेम अभिनेता मोहित रैना(Mohit Raina) याने अभिनेत्री सारा शर्मा(Sara Sharma) आणि अन्य चार जणांविरोधात खंडणीची तक्रार दाखल केली आहे. गोरेगाव पोलिसांनी सारा शर्मासह चार आरोपींविरोधात तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंद केली आहे. कोर्टाच्या निर्देशानंतर पोलिसांनी मोहित रैनाची तक्रार दाखल करून घेतली. मोहित रैनाच्या जीवाला धोका आहे असा दावा अभिनेत्री सारा शर्माने केला होता.
गोरेगाव पोलीस ठाण्याचे डीसीपी चैतन्य म्हणाले की, कोर्टाच्या आदेशावर सीआरपीसी कलम १५६ आणि आयपीसी कलम ३८४ अंतर्गत ६ जून रोजी गोरेगाव पोलिसांनी अभिनेत्री सारा शर्मा आणि ४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणावर अभिनेता मोहित रैनाने मुलाखतीत म्हटलंय की, सध्या मी कायदेशीर लढाई लढत आहे. कोर्टाच्या आदेशानंतर आता एफआयआर दाखल झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयात याबाबत सुनावणी होणार आहे. हे प्रकरण कोर्टात असल्याने त्यावर जास्त भाष्य करू शकत नाही असं त्याने सांगितले आहे.
काय आहे प्रकरण?
अभिनेत्री सारा शर्मा हिने दावा केला होता की, मोहित रैना याच्या जीवाला धोका आहे. मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतेय. सारा शर्मा स्ट्रगलिंग एक्ट्रेस आहे. तिने अधिकाधिक तेलुगू सिनेमा इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी सारा शर्मा म्हणाली की, मोहितच्या जीवाला धोका आहे. तो सुशांत सिंह राजपूत(Sushant Singh Rajput) प्रमाणे आत्महत्या करू शकतो. त्यावेळी साराच्या या दाव्याला अभिनेता मोहित रैनाने नाकारलं होतं. मोहित आणि त्याच्या कुटुंबाने पुढे येऊन सांगितले की, मोहित पूर्णपणे निरोगी आणि ठीक आहे.
साराने सोशल मीडियावर मोहित बचाओ असं अभियानही सुरु केलं होतं. अभिनेत्रीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, मोहित रैना याची अवस्था अभिनेता सुशांत सिंह राजपूतप्रमाणे झाली आहे. तो कधीही आत्महत्या करू शकतो. सोशल मीडियात ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मोहित आणि त्यांच्या कुटुंबाने सारा शर्माचा दावा फेटाळला होता. मोहित या प्रकरणात बोरिवली कोर्टात पोहचला. कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी अभिनेत्री सारा शर्माविरोधात गुन्हा नोंद केला आहे. मोहितने सारा शर्मासोबत आशिव शर्मा, परवीन शर्मा आणि मिथिलेश तिवारी यांच्याविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या चौघांविरोधात पोलिसांनी धमकावणे, षडयंत्र रचणे, खंडणी मागणे आणि चुकीची माहिती पसरवणे या आरोपाखाली गुन्हा नोंद केला आहे.