'नजर' मालिकेतील एका सीनसाठी मोनालिसाने घेतले 'ह्या' गोष्टीचे प्रशिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 06:00 PM2018-08-02T18:00:33+5:302018-08-03T08:30:00+5:30
'नजर' मालिकेत डायनची प्रमुख भूमिका मोनालिसा साकारते आहे.
कलाकार एखादी भूमिका वास्तविक वाटण्यासाठी खूप मेहनत घेत असतात. छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मोनालिसा मेहनती कलाकारांपैकी एक आहे. स्टार प्लस वाहिनीवरील 'नजर' मालिकेत डायनची प्रमुख भूमिका मोनालिसा साकारते आहे. या भूमिकेसाठी तिने खूप मेहनत घेतली आहे. या मालिकेतील एका सीनसाठी मोनालिसाने वॉल क्लाईंबिंगचे धडे गिरविले.
याबाबत मोनालिसा म्हणाली,'कथानकाचा भाग म्हणून माझी व्यक्तिरेखा मोहना झाडांवर चढते आणि भिंतींवर अगदी सहजपणे चालते. माझ्या व्यक्तिरेखेच्या ह्या वैशिष्ट्यांमुळे मी ह्या भूमिकेच्या प्रेमातच पडले. त्यामुळे माझे काम अगदी
अचूक होण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. मालिकेत मी प्रथमच स्टंट करताना दिसणार आहे. त्यामुळे मी वॉल क्लाईंबिंगचे धडे घेतले. ते नक्कीच आव्हानात्मक होते. पण मला खूप मजा आली.'
'नजर' ही अमानवी शक्तींवर आधारित मालिका असून त्याचे कथानक मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगरात घडते. या शहरात राहणाऱ्या राठोड परिवाराच्या अनेक पिढ्यांवर एका डायनची वाईट नजर पडलेली असते आणि त्यामुळे त्यांचे जीवन कसे संकटमय होते, त्याची ही कथा आहे. या मालिकेबद्दल मोनालिसाने सांगितले की, 'लहान असल्यापासून मी डायन आणि त्यांच्या वाईट नजरेबद्दल मी इतक्या कथा ऐकल्या आहेत, पण मला तिचीच भूमिका छोट्या पडद्यावर रंगविण्यास मिळेल, असा मी कधीच विचार केला नव्हता. या मालिकेची मन खिळवून ठेवणारी कथा, आधुनिक भारतातील शहरांमध्ये अमानवी शक्तींमुळे घडणारे प्रसंग आणि यातील डायनचे सौंदर्य आणि तिच्या रूपाभोवती असलेल्या वलयामुळे मी या भूमिकेकडे आकर्षिले गेले.'
'नजर' या मालिकेत मोनालिसा सोबतच स्मिता बन्सल, इशिता धवन, कपिल सोनी यांच्यादेखील मुख्य भूमिका आहेत.