एकापेक्षा एक सरस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2016 11:44 AM2016-08-27T11:44:48+5:302016-09-30T12:33:32+5:30
द व्हॉईस इंडिया किड्स या कार्यक्रमातील चिमुकल्यांनी त्यांच्या आवाजाने सध्या सगळ्यांनाच भुरळ घातली आहे. प्रस्थापित गायकांइतकाच या लहान मुलांचा ...
द व्हॉईस इंडिया या कार्यक्रमातील सगळीच मुले ही पंधरा वर्षांपेक्षाही लहान आहेत. त्यातील एक स्पर्धक तर केवळ सहा वर्षांची आहे. ही सगळीच मुले भारतातील विविध भागातील आहेत. या मुलांनी त्यांच्या आवाजाने लोकांना अक्षरशः वेड लावले आहे. अयात शेख, हरवीर चावला, प्रियांशी श्रीवास्तव, रिदीप्ता शर्मा, निशथा शर्मा, सान्वी शेट्टी या द व्हॉईस इंडियाच्या स्पर्धकांनी लोकमत ऑफिसला भेट दिली.
काहीच दिवसांत गणपतीचे आगमन होणार आहे. त्यामुळे या सगळ्या स्पर्धकांनी त्यांचे गणपती बाप्पाचे आवडते गाणे गाऊन दाखवले, त्याचसोबत प्रत्येकाने आपल्या आवडत्या चित्रपटातील आवडते गाणेदेखील गायले. द व्हॉईस इंडिया या कार्यक्रमातील सगळ्याच स्पर्धकांच्या आवाजावर रसिक फिदा आहेत. त्यांचा आवाज ही दैवी देणगी असल्याचेच म्हटले जाते. इतक्या लहान वयात सूरांचे त्यांना असलेले ज्ञान हे खरेच प्रत्येकाला आर्श्चचकित करणारे आहे. ही लहान मुले जितकी चांगली गायक आहेत तितकेच या सगळ्यांमध्ये विविध गुणदेखील आहेत.
या कार्यक्रमात शान, शेखर आणि नीती मोहन मेन्टॉरची भूमिका साकारत आहेत. या मुलांनी आपल्या मेन्टॉरची नक्कलदेखील करून दाखवली. यांनी केलेली नक्कल पाहिल्यानंतर कोणालाच हसू आवरत नव्हते. गायनासोबतच ही मंडळी खूप चांगला अभिनयही करतात याची सगळ्यांनाच खात्री पटली. नक्कल करून दाखवल्यानंतर या मुलांनी गाण्याच्या भेंड्यादेखील खेळल्या. गाण्यांच्या भेंड्यांमध्ये कोणतीच टीम मागे पडत नव्हती. कित्येक मिनिटे या भेंड्या सुरूच होत्या. सगळेच या गाण्याच्या भेंड्या खेळण्यात दंग झाले होते.
भेंड्या खेळल्यानंतर या मुलांनी लोकमतच्या टीमसोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या. त्यांच्या आवडीनिवडी, चित्रीकरणा दरम्यानचे त्यांचे अनुभवही त्यांनी सांगितले. खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्यानंतर काहींनी आपल्या आवडत्या गाण्यावर नृत्यदेखील सादर केले. त्यांना पाहिल्यानंतर ही मुले गायनात, अभिनयात, नृत्यात कशातच मागे नाहीत असेच वाटते.