'मिसेस मुख्यमंत्री' फेम अभिनेत्याची नवी इनिंग, दिग्दर्शनात पहिलं पाऊल, म्हणतो- "मला अभिनयानंतर..."
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 12:35 PM2024-08-30T12:35:36+5:302024-08-30T12:36:09+5:30
तेजस एका नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अभिनयानंतर आता त्याने दिग्दर्शनात पाऊल ठेवलं आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने तेजसने त्याच्या या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे.
'मिसेस मुख्यमंत्री' ही छोट्या पडद्यावरील गाजलेल्या मालिकांपैकी एक. झी मराठी वाहिनीवरील या मालिकेतून अभिनेता तेजस बर्वे घराघरात पोहोचला. या मालिकेने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. यानंतर काही मालिका आणि सिनेमांमध्येही तो महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसला. आता तेजस एका नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अभिनयानंतर आता त्याने दिग्दर्शनात पाऊल ठेवलं आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने तेजसने त्याच्या या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे.
सध्या बाप्पाच्या आगमनाची सर्वत्र लगबग पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवानिमित्त 'मिसेस मुख्यमंत्री' फेम अभिनेता तेजस बर्वेचं ‘गजानना’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या गाण्याचं दिग्दर्शन तेजसने केलं आहे. तर 'चला हवा येऊ द्या' फेम रोहित चव्हाण मुख्य कलाकाराच्या भूमिकेत असून अक्षय आणि कांचन वाटवे हे सहकलाकाराच्या भूमिकेत आहेत. या गाण्याला मयूर बहुळकर यांनी संगीत दिलं आहे. तर प्रणव बापट यांची गीतरचना आहे. अनुश्री फिल्म्स या युट्यूब चॅनेलवर हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.
या गाण्याबाबत तेजस म्हणाला, “माझं आणि बाप्पाचं नातं खूप जवळचं आहे. मी बाप्पाचा लाडका आहे, असं लहानपणापासून मला वाटतं. मी बाप्पाच्या आगमनाला ढोल वाजवायचो. त्यासाठी मी खास ढोलपथक जॉइन केलेलं. मला अभिनयानंतर दिग्दर्शन करायची इच्छा होती आणि मला बाप्पापासूनच करायची होती. आणि तसंच घडलं, स्वप्नपूर्ती झाली. माझ्या नवीन कामाचा श्री गणेशा या गाण्यापासून होतोय. एका मूर्तिकाराची आणि बाप्पाची भावनिक कथा सांगण्याचा यातून मी प्रयत्न केला आहे. या गाण्याचा शेवटचा सीन शूट करताना सेटवरील सर्वजण भावूक झाले होते. मी लहानपणी गणपती विसर्जनासाठी घाटावर गेलो होतो तेव्हा एक लहान मुलगी खूप रडत होती. त्याचवेळी मला या गाण्याची संकल्पना सुचली. आणि बाप्पाप्रति भावना मी यात मांडली. प्रेक्षकांना आमचं गाणं आवडतंय. आमच्या सर्व गाण्यांवर असंच प्रेम असू द्या हीच सदिच्छा.”
निर्माते मयूर तातुसकर गाण्याच्या संकल्पनेविषयी सांगताना म्हणतात, “गाण्याची संकल्पना साकारण्यामागे खूपच वेगळा विचार होता. गणपती बाप्पाच्या उत्सवाच्या काळात, आपण प्रचंड उत्साह आणि भक्तिमय वातावरण अनुभवतो. परंतु, या गाण्यात आम्ही भक्ताच्या बाप्पाप्रती असलेली भक्तीची भावनिक व्याख्या सादर केली आहे. आमचा उद्देश होता की, हे गाणं आजच्या तरुणाईसाठीही समर्पक असावं, त्यामुळे गाण्याच्या संकल्पनेत पारंपारिकतेसोबत कथेचा वापर करण्यात आला. यामध्ये संगीताची ऊर्जा आणि गाण्याचे शब्द, हे दोन्ही आपल्याला भक्तीच्या नव्या उंचीवर घेऊन जातात. एक सीन होता ज्यामध्ये मुख्य कलाकार रोहित चव्हाण हे गणेशाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होऊन प्रार्थना करीत होते. त्या क्षणी, वातावरणात अशी काही आध्यात्मिकता आणि ऊर्जा निर्माण झाली की, सगळेच जण भावनिक झाले. अशाच एका सीनमध्ये दिग्दर्शक तेजस बर्वे यांनी, गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने, हे मिश्रण केलं, यातील काही भाग स्क्रिप्टमध्ये नव्हता, परंतु त्या क्षणात इतका प्रभावशाली ठरला की, आम्ही तो सीन गाण्यात कायम ठेवला. ‘गजानना’ या गाण्यानंतर आम्ही वेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करत आहोत, ज्यामध्ये इतिहासाशी संबंधित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंहगड किल्ल्याचा इतिहास दाखवणारी एक डॉक्युमेंटरी-ड्रामा असेल. अनुश्री फिल्म्स प्रेक्षकांसाठी नेहमीच नवनवीन कलाकृती घेऊन येतील. तुम्हा सर्वांचं प्रेम कायम असंच राहो.”