छोट्या पडद्यावरील नायिकांना मालिकांमध्ये हवा आहे हा बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 04:11 PM2018-10-30T16:11:58+5:302018-10-31T07:15:00+5:30

अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमामध्ये गिरीश कुलकर्णी आणि जितेंद्र जोशी तसेच कलर्स मराठीवरील प्रेक्षकांच्या लाडक्या नायिका सुखाच्या सरींनी हे मन बावरे मधील मृणाल दुसानिस, घाडगे & सून मधील भाग्यश्री लिमये आणि राधा प्रेम रंगी रंगली मधील वीणा जगताप हे कलाकार मकरंद अनासपुरे यांच्यासोबत दिलखुलास गप्पा मारणार आहेत.  

mrunal dusanis, bhagyashree limaye and veena jagtap in assal pavhane irsal namune | छोट्या पडद्यावरील नायिकांना मालिकांमध्ये हवा आहे हा बदल

छोट्या पडद्यावरील नायिकांना मालिकांमध्ये हवा आहे हा बदल

googlenewsNext

कलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांना दर आठवड्याला मनोरंजनाची पर्वणी मिळते. प्रत्येक भागामध्ये मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील, समाज सेवेमध्ये कार्यरत असलेले, राजकारण, क्रीडा या क्षेत्रातील महाराष्ट्रातील नावाजलेल्या मंडळींसोबत मकरंद अनासपुरे मनमोकळ्या गप्पा मारतात. या आठवड्यामध्ये सुद्धा असेच काही लोकप्रिय कलाकार प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. हे कलाकार देखील कार्यक्रमामध्ये त्यांचे काही अनुभव, लोकांना माहीत नसलेले किस्से सांगणार आहेत. कार्यक्रमामध्ये या आठवड्यामध्ये गिरीश कुलकर्णी आणि जितेंद्र जोशी तसेच कलर्स मराठीवरील प्रेक्षकांच्या लाडक्या नायिका सुखाच्या सरींनी हे मन बावरे मधील मृणाल दुसानिस, घाडगे & सून मधील भाग्यश्री लिमये आणि राधा प्रेम रंगी रंगली मधील वीणा जगताप हे कलाकार मकरंद अनासपुरे यांच्यासोबत दिलखुलास गप्पा मारणार आहेत.  

कार्यक्रमामध्ये आलेल्या मंडळींसोबत खुसखुशीत विनोद, चर्चा आणि किस्से तर रंगलेच. पण मृणाल दुसानिसने एक सुंदर गाणे देखील सादर केले. तसेच मकरंद यांनी अमृताला म्हणजेच भाग्यश्रीला तिला कुठल्या गोष्टीचा राग येतो हे विचारले असता भाग्यश्रीचे उत्तर ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. भाग्यश्री म्हणाली, “मला प्राण्यांबद्दल खूप प्रेम आहे आणि अगदी मुंगीला सुद्धा जर माझ्यासमोर मारलं तर मला खूप राग येतो आणि रागात मी रडायला लागते... लहानपणी मी माझ्या फ्रेडन्सना सांगायचे की प्राण्यांना मारू नये... डासांना देखील मारायचे नाही... हे ऐकताच सगळ्यांना हसू आवरले नाही... यानंतर कशाची भीती वाटते असे विचारले असता भाग्यश्रीला वाघांची भीती वाटते असे ती म्हणाली ... त्यावर मकरंद यांनी खूपच गमतीशीर प्रश्न विचारला की, अमेय वाघ बरोबर काम करशील का? यावर ती काय म्हणाली याचे उत्तर तुम्हाला हा कार्यक्रम पाहिल्यावरच मिळेल.

तसेच मालिकांमधील नायिकांनी त्यांचा लूक बदलावा. साडी वैयक्तिरिक्त देखील इतर कपड्यांमध्ये त्यांनी दिसावे यावर या तिघींनी त्यांचे म्हणणे मांडले. भाग्यश्री म्हणाली, मालिकेमध्ये साडी नेसलेली नायिका खूप सुंदर दिसते. पण आम्हाला तसा त्याचा त्रास होतो. चित्रीकरण करताना खूप उकडतं... वीणाने देखील सांगितले, साडी नेसायला वेळ लागतो. या तिघींचे साडीबद्दलचे म्हणणे सारखे होते. मृणाल देखील म्हणाली, आता कुठलीही मुलगी साडी नेसून घरामध्ये वावरत नाही. सासरी देखील आता असं काही राहिलेले नाही की, मुलीने साडीच नेसली पाहिजे. जर हा बदल समाजामध्ये होतो आहे तर आपण देखील मालिकांमध्ये हा बदल दाखवला तर चालू शकतो.

अभिनयाची उमज आणि सामाजिक समज असलेले दोन बहुरंगी नट म्हणजेच गिरीश कुलकर्णी आणि जितेंद्र जोशी यांनी देखील या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. चक्रव्यूह राऊंड मध्ये जितेंद्र आणि गिरीश यांनी मिळून मकरंद यांनाच प्रश्न विचारले. हा कार्यक्रम प्रेक्षकांना गुरुवार आणि शुक्रवार रात्री ९.३० वाजता पाहायला मिळणार आहे.

Web Title: mrunal dusanis, bhagyashree limaye and veena jagtap in assal pavhane irsal namune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.