मुकेश खन्नांचा कपिल शर्मावर राग; म्हणाले, "जो श्रीरामाचा आदर करत नाही तो..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 11:04 IST2024-12-15T09:32:44+5:302024-12-15T11:04:13+5:30
'शक्तिमान' पुन्हा गरजला, कपिल शर्माला धरलं धारेवर

मुकेश खन्नांचा कपिल शर्मावर राग; म्हणाले, "जो श्रीरामाचा आदर करत नाही तो..."
'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना (Mukesh Khanna) सध्या चर्चेत आहेत. अनेकदा ते बॉलिवूड कलाकारांविषयी बोलताना दिसतात. मधल्या काळात त्यांनी रणवीर सिंहला नावं ठेवली होती. तर आता नुकतंच त्यांनी कपिल शर्माविरोधात वक्तव्य केलं आहे. कपिल शर्माच्या(Kapil Sharma) कॉमेडी शोवरही टीका केली आहे. जो भगवान श्रीरामाचा आदर करत नाही तो भीष्म पितामहचा तरी काय करेल? असं ते एका मुलाखतीत म्हणाले.
अभिनेते मुकेश खन्नांनी नुकतीच सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधला. तसंच कपिल शर्माच्या शोमध्ये सहभागी न झाल्याचं कारण सांगितलं. ते म्हणाले, "त्याने कधी माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही. त्याचा नक्की काय प्रॉब्लेम आहे माहित नाही. एकदा गूफी पेंटलने मला फोन करुन सांगितलं की कपिलने रामायण मधील कलाकारांना शोवर बोलवलं आहे. तो कदाचित आपल्यालाही बोलवेल. पण असं झालं नाही. कपिलने महाभारत च्या कलाकारांना बोलवलं पण मला नव्हतं बोलवलं. मीही आधीच ठरवलं होतं की मी या शोमध्ये जाणार नाही. मला या शोमध्ये अश्लीलता दिसते. त्याचे बरेच डायलॉग्सही डबल मीनिंग असतात. मला त्याच्या शोमध्ये सभ्यता दिसत नाही. म्हणूनच मी शोमध्ये सहभागी होणार नसल्याचं गूफी पेंटलला सांगितलं होतं."
ते पुढे म्हणाले, "मी शोचा एक प्रोमो पाहिला होता ज्यात अरुण गोविल आणि टीम आलेली आहे. यावेळी अरुण गोविल यांना म्हणतो की, 'सर तुम्ही बीचवर अंघोळ करत आहात आणि तेव्हाच तिथे लोकांची गर्दी जमली आणि ते ओरडले की बघा, राम सुद्धा वीआयपी अंडरवेअर घालतात.' या जोकवर अरुण गोविस फक्त हसून चूपचाप बसलेले दिसतात. मी असतो तर मला हे सहन झालं नसतं. तुम्ही कोणाला काय विचारत आहात याचं भान असू नये? ज्याने श्रीरामाचा आदर केला नाही तो भीष्म पीतामहांचा काय करेल? त्याच वेळी मी ठरवलं की मी या शोमध्ये जाणार नाही."
त्यांनी कपिलचा आणखी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले,"एका अवॉर्ड फंक्शनला माझी आणि कपिलची भेट झाली होती. तेव्हा त्याने माझ्याकडे दुर्लक्ष केलं. तो १० मिनिटं माझ्या बाजूला बसला होता पण एकदाही हॅलो सुद्धा म्हणला नाही. मी असं म्हणतच नाही की त्याने माझ्याशी बोलावं पण ओळख दाखवण्याची एक पद्धत असते. मी जेव्हा केव्हा अमिताभ बच्चन यांना भेटतो मग भलेही त्यांच्यासोबत मी काम केलं असो वा नसो मी त्यांची विचारपूस करतो. कपिल चांगला कॉमेडियन आहे पण त्याच्यात खूप अहंकार आहे."