मुकेश खन्ना यांच्या टीकेवर पहिल्यांदाच बोलला कपिल शर्मा, म्हणाला -
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 09:09 AM2020-10-20T09:09:31+5:302020-10-20T09:13:55+5:30
मुकेश खन्ना यांच्या प्रतिक्रियेनंतर महाभारतात युधिष्ठिरची भूमिका साकारणारे गजेंद्र चौहान यांनी मुकेश खन्ना यांच्यावर टीका केली होती. पण त्यावेळी कपिल शर्मा यावर काहीच बोलला नव्हता.
स्टार कॉमेडीयन कपिल शर्माने अखेर अभिेनेते मुकेश खन्ना यांनी केलेल्या टीकेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाभारतात लोकप्रिय भूमिका साकारणारे मुकेश खन्ना यांनी कपिल शर्माचा शो व्हल्गर असल्याचं म्हटलं होतं. तसेच या शोमधील कॉमेडीचा स्तर वाईट असल्याचंही ते म्हणाले होते. मुकेश खन्ना यांच्या प्रतिक्रियेनंतर महाभारतात युधिष्ठिरची भूमिका साकारणारे गजेंद्र चौहान यांनी मुकेश खन्ना यांच्यावर टीका केली होती. पण त्यावेळी कपिल शर्मा यावर काहीच बोलला नव्हता.
कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये रामायण मालिकेच्या टीमला बोलवण्यात आलं होतं. त्यानंतर महाभारताच्या टीमलाही बोलवण्यात आलं बोतं. पण या मालिकेचा महत्वाचा भाग राहिलेले मुकेश खन्ना हे शोमध्ये आले नव्हते. आता कपिल शर्माने या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, 'माझी टीम आणि मी कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचं काम करत आहोत'. (इंडस्ट्रीत तुझी इज्जत काय...? मुकेश खन्ना यांचा पुन्हा गजेंद्र चौहान यांच्यावर निशाणा)
कपिल पुढे म्हणाला की, 'जेव्हा जग एका कठिण काळातून जात असेल तर लोकांना हसवणं आणखी महत्वाचं ठरतं. हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं की, त्यांना आनंद कशात शोधायचा आहे. आणि कोणत्या गोष्टीत कमतरता आहे. मी आनंदाला निवडलं आहे आणि मी माझ्या कामावर फोकस करण्याला प्राथमिकता देणार. भविष्यातही असंच करत राहणार'. (ते ‘महाभारत’ विसरलेत का? ‘कपिल शर्मा शो’वरून मुकेश खन्ना-गजेंद्र चौहान यांच्यात जुंपली)
दरम्यान, मुकेश खन्ना यांनी कपिल शर्मा शोबाबत इन्स्टाग्रामवर लिहिले होते की, 'हा शो फार व्हल्गर आहे. डबल मीनिंग शब्दांचा यात वापर होतो. पुरूष महिलांचे कपडे घालून विचित्रपणे वागतात आणि लोक आपलं पोट पकडून हसतात'.
यासोबतच मुकेश खन्ना यांनी अर्चना पूरन सिंह आणि नवज्योत सिंह सिद्धूवरही टीका केली होती. त्यांनी लिहिले होते की, 'मेकर्स या शोमध्ये एका व्यक्तीला बसवतात ज्याचं काम केवळ हसणं असतं. हसणंही खरं नसतं. पण त्यातून पैसा मिळतो. याआधी भाऊ सिद्धू या कामासाठी बसला होता. आता बहीण अर्चना हे काम करत आहे. त्यांचं काम काय आहे तर केवळ बसून हसणं'.